द्राक्ष उत्पादकांची पैशांसाठी वणवण

द्राक्ष उत्पादकांची पैशांसाठी वणवण

Published on

द्राक्ष उत्पादकांची पैशांसाठी वणवण
व्यापाऱ्यांकडे ३९ लाख थकीत असल्याने फरपट
तुर्भे/जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : मुंबई बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यांकडे द्राक्षाची थकबाकी मिळण्यासाठी तासगावमधील शेतकरी गेली आठ वर्षे बाजार समितीकडे फेऱ्या मारत आहे. बाजार समिती, पणन विभाग, पोलिसांकडे तक्रार करूनही ३९ लाखांची थकीत रक्कम मिळाली नसल्याने आत्महत्या करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे.
शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांना योग्य दरात कृषिमाल उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यभरात बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या बाजार समितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा दलाल, अडते, व्यापारी यांच्याकडे माल येतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे, मात्र तासगावमधील द्राक्ष उत्पादक बाळासाहेब झांबरे यांना २०१६ मध्ये पाठवलेल्या द्राक्षांपोटीच्या ३९ कोटींसाठी आठ वर्षांपासून फेऱ्या मारत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, बाजार समितीकडे याबाबतची रीतसर तक्रार केल्याने न्याय मिळेल, अशी आशा झांबरे यांना होती, मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नसल्याने त्यांची उपेक्षा झाली आहे.
-------------------------------------
रकमेच्या अपहाराचा संशय
ःः- शेतकरी बाळासाहेब झांबरे यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली. संबंधित व्यापाराचा बाजारात असलेला गाळा ही लिलावात काढण्यात आला. या लिलावातून करोडोच्या किमतीत व्यापाराचा गाळा विकला गेला. याची तीळमात्र कल्पना शेतकऱ्याला देण्यात आलेली नाही.
- व्यापाऱ्याचा गाळा ९५ लाख रुपयांना विकला गेला. त्यातून बँकेचे ३६ लाख फेडले, मात्र उर्वरित ५९ लाखांचा हिशोब प्रशासनाने दिलेला नाही. या रकमेचा अपहार झाल्याचा संशय शेतकरी झांबरे यांनी व्यक्त केला आहे.
-------------------------------------
माझ्या हक्काच्या पैशांसाठी आठ वर्षे झगडतोय. आदेश असूनही संचालक, सचिव मला न्याय देऊ शकले नाहीत. माझा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे; पैसे मिळाले नाहीत, तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
- बाळासाहेब झांबरे, द्राक्ष उत्पादक, शेतकरी
-------------------------------------
संबंधित शेतकऱ्याचा व्यवहार बाजार समितीच्या आवाराबाहेर झाला आहे, शिवाय माल विकणारे शेतकरी नसून व्यापारी आहेत. त्यामुळे बाजार समिती अशा प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करता येत नाही.
- राजेंद्र कोंडे, उपसचिव, फळबाजार
----------------------
या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विकास रसाळ, प्रशासक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
़़़़़़़़़़़़़़़

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com