मेट्रोस्थानकासाठी खाऊगल्ली हटवण्याचा डाव

मेट्रोस्थानकासाठी खाऊगल्ली हटवण्याचा डाव

Published on

मेट्रो स्थानकासाठी खाऊ गल्ली हटवण्याचा डाव
सीएसएमटीलगतच्या स्टॉलधारकांचा आरोप
कुलाबा, ता. १७ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या परवानाधारक स्टॉलधारकांना आपले स्टॉल बंद करण्याच्या नोटिसा पालिका प्रशासनाने बजावल्‍या आहेत. या नोटिशींमुळे वर्षोनुवर्षे या ठिकाणी व्यवसाय करणारे दुकानदार हवालदिल झाले आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली नव्या मेट्रो स्थानकासाठी आमचे स्टॉल कायमस्वरूपी हटवण्याचा डाव पालिका प्रशासनाचा असल्याचा आरोप स्टॉलधारकांनी केला आहे.
आझाद मैदानाला लागून असलेल्या क्रीडा भवनचा पुनर्विकास होत आहे. या कामासाठी अडथळा होईल, यासाठी हे स्टॉल हटविण्याची नोटीस पालिका प्रशासनाने दिली आहे. कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करावी आणि कागदपत्रे महापालिकेकडे सादर करावीत, असे महापालिका प्रशासनाने सांगितल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले. मात्र मुळात नव्या मेट्रो स्थानकालगतच आमची ही खाऊ गल्ली आहे. त्यामुळे क्रीडा भवनच्या विकासाच्या नावाखाली ही खाऊ गल्लीच हटवण्याचा हेतू पालिका प्रशासनाचा असल्याचे या स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. या अन्यायाविरोधात स्टॉलधारकांनी स्थानिक आमदारांकडे धाव घेतली आहे.
खाऊ गल्लीमध्ये गेल्या ८० वर्षांपासून इमानेइतबारे आपला व्यवसाय करणाऱ्या ११ परवानाधारक स्टॉलधारकांना अचानक पालिकेची नोटीस आली. यामध्ये आयकॉनिक कॅनन पावभाजी सेंटरला वगळण्यात आले आहे. मात्र लगतच्या शर्मा पावभाजी स्टॉल, नानाचा चहा, अन्नाचा इडली, डोसा, वडा सांबार, कोल्ड्रिंक अशा वेगवेगळ्या ११ दुकानांना नोटीस मिळाली आहे. यातील बहुताश दुकाने मूळ मालकाने भाडेतत्त्वावर दिली आहेत.

स्वस्त पर्याय
या ठिकाणच्या स्टॉलमध्ये स्वस्त दरात खवय्यांना अन्न उपलब्ध होते. विशेषतः आझाद मैदानात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धरणे, मोर्चे आणि आंदोलनासाठी आलेले लोक या खाऊ गल्लीमध्ये आपली व आपल्या कार्यकर्त्यांची भूक भागवण्यासाठी येतात. आझाद मैदान परिसरात दीड किलोमीटरपर्यंत कुठल्याही प्रकारचे हॉटेल नाही. शिवाय दर कमी असल्यामुळे सीएसएमटीवर येणारे प्रवासी या खाऊ गल्लीमध्ये पोटपूजा करतात.

खाऊ गल्लीमधील स्टॉलधारकांना हटवल्यास सामान्य मुंबईकरांना स्वस्त दरात अन्न कुठे मिळेल, याचा विचार प्रशासनाने करायला हवा.
- अंकुश शिंदे, पादचारी

येथील स्‍टॉलधारक म्‍हणाले, की महापालिका मुख्यालयालगतच आमचे स्टॉल आहेत. वर्षानुवर्षे या ठिकाणी आम्ही सेवा देत आहोत. अचानक महापालिका सांगते, की तुमचे स्टॉल पाडावे लागतील. महापालिकेला क्रीडा क्लब विकसित करायचा आहे. हे चुकीचे आहे, असे एका स्‍टॉलधारकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com