पितृपक्षात मुंबईत कावळे मिळणे दुरापास्त
पितृपक्षात मुंबईत कावळे मिळणे दुरापास्त
गायीला नैवेद्य देणे वा दर्भाचा पक्षी बनवण्याचा पर्याय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : हिंदू संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर करण्यात येणाऱ्या पिंडाला कावळा शिवल्यास मोक्ष मिळतो, असे मानले जाते. परंतु पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी तेवढ्यापुरतेच कावळ्यांचे स्मरण होत असल्याच्या मानवी स्वार्थामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत घट होत आहे. मुंबईत पिंडाला कावळा न शिवल्यास गायीला नैवेद्य देणे किंवा दर्भाचा (पवित्री) कावळा तयार करण्याचा पर्याय अवलंबला जात आहे.
पितृपक्षात कावळा मिळणे कठीण झाले आहे. पर्यावरणाच्या बदलाचा परिणाम कावळ्यांवर झाला आहे. त्यामुळे पितृपक्षात नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची प्रतीक्षा करीत अखेर पूर्वजांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा लागत आहे. कावळ्यांची संख्या अशीच घटत राहिल्यास येणाऱ्या काळात पिंडाला शिवायलादेखील कावळा मिळणार की नाही, अशी भीतीही व्यक्त केली जाते. मोबाईल टॉवरमुळे चिमण्या नाहीशा होत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमींकडून होत होत्या. ज्या ठिकाणी उंच झाडे आहेत त्या ठिकाणी कावळे असतात; परंतु लहान झाडांजवळ कावळे बसत नाहीत. त्यामुळे कावळे मिळण्यास अडचण भेडसावत आहे. वातावरणातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा एकमेव पक्षी म्हणून कावळ्याकडे पाहिले जाते. अंटार्कटिका खंड वगळता जगभरात आढळणारा हा पक्षी असून, त्याच्या ३५ ते ४० प्रजाती असून भारतात सहा प्रकारच्या प्रजाती आढळतात. उष्ट्या, शिळ्या, खरकट्या अन्नावरसुद्धा हा बिनधास्त ताव मारून गुजराण करीत असल्याने कावळ्याकडे पर्यावरणाचा सफाई कामगार म्हणून पाहिले जाते. दरम्यान, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हा वापर पक्ष्यांच्या काही प्रजातींच्या मुळावर आलेला आहे.
पक्षी हे पिकांवरील कीड नियंत्रणात मोठी भूमिका बजावत असतात. त्यामुळे पक्षी संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केले आहे. अप्रत्यक्षपणे वृक्षलागवडीचे काम कावळ्यांसारख्या पक्ष्यांकडून होत असते. नैसर्गिक स्वच्छतादूत असणारे कावळे पर्यावरणाची साखळी चालविण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
...
कावळे काहीही खाऊन जगू शकतात; पण त्यांना घरटे बांधायला उंच झाडे कमी झाली आहेत. तसेच अनेक जण उंदीर मारण्यासाठी विष टाकतात, मेलेला उंदीर कचऱ्यात टाकतात. तो खाऊन कावळा दगावतो. तसेच उंदरांना आजार होतात. तसे उंदीर खाल्ले तर कावळ्यांनाही त्याचे संक्रमण होऊन कावळे मरतात. त्यामुळे कावळ्यांची संख्या कमी होताना दिसते.
- डॉ. रीना देव, पशुवैद्यक
...
मुंबईतील उंच झाडे दिवसेंदिवस कमी होत असून, त्याचा परिणाम कावळ्यांच्या संख्येवर होत आहे. जर एखाद्या पिंडाला कावळा शिवला नाही किंवा तिथे कावळा आलाच नाही तर दर्भाचा (पवित्री) कावळा तयार केला जातो. तो कावळा पिंडाला लावला जातो.
- राजेश जंगम, भटजी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.