काँग्रेसचा हाथ, बेरोजगारांना साथ!
काँग्रेसचा हाथ, बेरोजगारांना साथ!
भाजपच्या राजकारणाला रचनात्मक कार्यातून उत्तर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः दादरमधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये पहिला रोजगार मेळावा घेतला गेला. ‘माझा रोजगार, माझा अधिकार’ या मोहिमेंतर्गत घेतलेल्या या मेळाव्यात महामुंबईतून अनेक तरुणांनी हजेरी लावली होती. आयटी, बँकिंग, विमा अशा विविध क्षेत्रांतील ७५ कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होऊन शेकडो तरुणांची निवड केली. या प्रक्रियेतून भाजपच्या फुटीच्या राजकारणाला रचनात्मक समाजकारणाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
कताच दादरच्या टिळक भवनात रोजगार मेळावा पार पडला. याचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. पक्षाच्या स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख धनंजय शिंदे यांच्या संकल्पनेतून हा मेळावा घेण्यात आला. त्यांच्या नेतृत्वात दीडशे लोकांची टीम या मेळाव्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून राबत होती. कमीत कमी नोंदणी करून जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळावा, अशा सूचना प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला दिल्या होत्या. त्यानुसार याचे स्वरूप कमी ठेवले. यामध्ये १२६५ जणांनी नोंदणी केली. जवळपास ३०० लोकांना यातून रोजगार मिळाल्याचे धनंजय शिंदे यांनी सांगीतले.
तालुक्यात मेळावे
रोजगार मिळवून देऊन घराघरात नव्याने काँग्रेसचा विचार पोहोचवण्याच्या पक्षाचा विचार आहे. ‘माझा रोजगार माझा अधिकार’ या अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात विभागवार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा, पालिका स्तरावर आणि तिसऱ्या टप्प्यात सर्व तालुक्यांत रोजगार मेळावे घेण्याचे उद्दिष्ट पक्षाने आखले आहे. नंदुरबार, गडचिरोली या मागास जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. पुढच्या तीन वर्षांत प्रत्येक तालुक्यात मेळावे आयोजित करण्याचा संकल्प पक्षाचा आहे. या माध्यमातून तरुणाईला काँग्रेस विचारधारेसोबत जोडण्याचा प्रयत्न असल्याचे धनजंय शिंदे यांनी सांगीतले.
कायमस्वरूपी मार्गदर्शक केंद्र
ज्या तरुणांची निवड होऊ शकली नाही त्यांना पुढच्या तयारीसाठी मदतही केली जाणार आहे. यासाठी टिळक भवनमध्ये कायमस्वरूपी रोजगार मार्गदर्शक केंद्र उभारण्यात आले असून, आठवड्याचे तीन दिवस यासाठी वेगळी टीम नियुक्त केली आहे.
राज्यात २.५ लाख सरकारी पदे तर केंद्रात २.५ कोटींपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, मेगाभरती करणार, या वल्गणा हवेतच विरल्या आहेत.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
केवळ राजकारण नव्हे तर बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याची संकल्पना या मेळाव्यांमागे आहे.
- धनंजय शिंदे, सरचिटणीस, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.