साहित्य संघानंतर आता एशियाटिकवर स्वारी?

साहित्य संघानंतर आता एशियाटिकवर स्वारी?

Published on

साहित्य संघानंतर आता एशियाटिकवर स्वारी?
निवडणुकीच्या तोंडावर सदस्य नोंदणीचा महापूर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः २२१ वर्षांचा वैभवशाली इतिहास असणाऱ्या एशियाटिक सोसायटीमध्ये अचानक सदस्य नोंदणीचा महापूर आला आहे. गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघावर ताबा मिळवण्यासाठी काहींचे निकराचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रकरण ताजे असतानाच एशियाटिकच्या इतिहासात आणि निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंतचे झालेल्या रेकॉर्ड ब्रेक सदस्य नोंदणीमागचे रहस्य नेमके काय, यावर आता घमासान चर्चा सुरू आहे. त्यामुळे संस्थेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा ही संस्था ताब्यात घेणे हा हेतू दिसतो, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
१८०४ मध्ये ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटी, मुंबईची स्थापना केली. साडेतीन लाख पुस्तके, दुर्मिळ नाणी, नकाशे, हस्तलिखिते, मूळ पुस्तकांच्या प्रती, बुद्धाचे भिक्षापात्र असा अनमोल खजाना असणारे एशियाटिक हे मुंबईसह महाराष्ट्राचे वैभव समजले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पैशाअभावी या ऐतिहासिक वास्तूचा डोलारा कोसळत आहे. निधीच्या कमतरतेमुळे कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे, पुस्तके ठेवण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही पडझड सावरण्याऐवजी या सोसायटीवर ताबा मिळवण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे. एशियाटिक सोसायटीच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक सदस्य नोंदणी गेल्या चार महिन्यांत झाली आहे. गेल्या काही वर्षांत नव्या सदस्य नोंदणीची वार्षिक आकडेवारी १०० किंवा १५०च्या पलीकडे गेली नाही. अलीकडे नव्या सदस्यांची वाट पाहण्याची वेळ व्यवस्थापनावर आली होती; मात्र गेल्या चार-सहा महिन्यांत ३००हून अधिक सदस्य नोंदणीचे अर्ज व्यवस्थापनासमोर आले. त्यात जवळपास २०० अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. काही अपवाद वगळता सर्वच्या सर्व अर्जदारांना सदस्यत्व मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश अर्ज हे एशियाटिकच्या एका माजी सचिवामार्फत येत असल्याची माहिती समोर येत आहे. गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघाची निवडणूक एका प्रभावशाली व्यक्तीने प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. नेमक्या याच्याशी संबंधित एक व्यक्ती एशियाटिकचा अर्ज भरला की नाही याची विचारपूस करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे सध्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर असलेले एक माजी सचिव या अर्जांचे गठ्ठे घेऊन येत आहेत.
...
सदस्यांच्या मतांचे गणित
एशियाटिक सोसायटीच्या एकूण सदस्यांची संख्या ३,५५४ एवढी आहे. आजपर्यंत एशियाटिक व्यवस्थापन मंडळासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये १५०च्या वर मतदान झालेल नाही. त्यामुळे नव्याने सदस्य झालेल्यांपैकी किमान ५० टक्के सदस्यांनी मतदानात भाग घेतला तरी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष सहज निवडून आणणे शक्य आहे. त्यामुळे या अर्ज नोंदणीमागे एशियाटिकचे व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. एशियाटिकची निवडणूक ३० सप्टेंबरला अपेक्षित होती; मात्र विश्वस्त मंडळाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे काही लोकांनी केलेल्या तक्रारीमुळे चौकशी लागल्यामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली आहे.
...
निवडणूक घेण्यात काही अडचणी आहेत; मात्र पुढच्या आठवड्यात आम्ही सर्वसाधारण बैठक बोलावली आहे.
- शेहनाज नलवाला, उपाध्यक्ष, एशियाटिक सोसायटी
...
विशिष्ट प्रवृत्तीचे लोक घुसखोरी करून संस्थेचे सदस्यत्व मिळवण्याचा, सभासद होण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न करीत आहेत. संस्थेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा ही संस्था ताब्यात घेणे हा हेतू दिसतो. निवडणुकीपूर्वी एवढ्या प्रमाणात सदस्य नोंदणी आजपर्यंत झाली नाही. यातील अनेकांचा ग्रथं चळवळीशी संबंध नाही. साहित्य संघासारखा प्रकार येथे घडताना दिसतो आहे.
- प्रकाश रेड्डी, नेते, माकप
...
३००हून अधिक अर्ज
- निवडणूक तोंडावर असताना ३००च्या वर अर्ज
- आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक सदस्य नोंदणी
- एकाच वेळी अर्जांचे गठ्ठे
- साहित्य संघासारखा प्रकार होण्याची भीती
- सदस्य करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून फोनाफोनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com