हद्दीच्या वादात वडवली रस्ता
बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : अंबरनाथकडून बदलापूरला येताना वडवली या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे जैसे थे अवस्थेत आहेत. हा रस्ता अंबरनाथ, बदलापूर पालिका व पुढे एमआयडीसी हद्दीत विभागला जातो. त्यामुळे या खड्ड्यांची जबाबदारी कोणत्या प्रशासनाची आहे, हे ठरलेले नसल्याने दुरुस्तीचा विषय अनुत्तरित राहिला आहे. परिणामी, वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ हद्दीवरील वडवलीमार्गे बारवी धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शिवभक्त विद्या मंदिरासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे एवढे गंभीर आहेत की, एखाद्या वाहनाला अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून वाहने चालवावी लागतात. पावसाळा सुरू झाल्यापासून आजतागायत हे खड्डे बुजवलेले नाहीत. त्याला कारण म्हणजे या रस्त्यावरील ज्या परिसरात खड्डे आहेत ती हद्द कोणत्या प्रशासनाच्या अंतर्गत येते, याचीच माहिती नाही. हद्द माहीत नसल्यामुळे खड्डे जैसे थे आहेत. या खड्ड्यांमुळे चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हा रस्ता अंबरनाथ शहराकडून बदलापूर शहराला जोडणारा आणि पुढे बारवी धरणाला जाणारा मुख्य रस्ता आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ असते. मोठमोठी अवजड वाहने, शाळेची बस, रिक्षा, दुचाकी, चारचाकी अशा सगळ्याच वाहनांची दिवसभर वर्दळ असते. रात्रीच्या वेळेत खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा वाहने एका बाजूला झुकतात. यामुळे अपघाताची भीती सतावत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करत आहेत.
आरोग्याच्या तक्रारीत वाढ
हातावर पोट असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज रिक्षा चालवून व्यवसाय करावा लागतो. या रस्त्यावरून जाताना आमच्या कंबरेला झटके बसतात. आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षाचालक देत आहेत.
अंबरनाथवरून वडवली व तिथून बारवी धरणाकडे जाणारा हा रस्ता अंबरनाथ नगरपालिका, काही रस्ता बदलापूर नगरपालिका आणि वडवली ते बारवी धरण हा रस्ता एमआयडीसी अंतर्गत येतो. त्यामुळे खड्डे पडलेला हा रस्ता कोणाच्या अंतर्गत येतो याची माहिती घेऊन पुढची कार्यवाही करण्यात येईल.
- विजय पाटील, नगर अभियंता
कुळगाव बदलापूर नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.