२००८ सालचा बॉम्बस्फोटाचे प्रकरण
मालेगाव खटल्याची
गुरुवारी पुन्हा सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावरील सुनावणीदरम्यान, मृतांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या अपुऱ्या तपशीलामुळे उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १७) अपिलावरील सुनावणी तहकूब केली. ती आता गुरुवारी होणार आहे.
अपीलकर्ते खटल्यात साक्षीदार होते की नाही, हे त्यांना दाखवावे लागेल. आम्हाला तपशील द्या, कोणी आरोपींच्या सुटकेला आव्हान देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने मागील सुनावणीवेळी नमूद केले होते. त्यानुसार बुधवारी सुनावणीदरम्यान मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अपीलकर्त्यांच्या वकिलाने तपशीलांचा तक्ता सादर केला; परंतु न्यायालयाने तो अपूर्ण असल्याचे म्हटले. तेव्हा पहिले अपीलकर्ता निसार अहमद हे खटल्यात साक्षीदार नसल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. तरीही अहमद यांना खटल्यादरम्यान हस्तक्षेप करण्याची आणि सरकारी वकिलांना मदत करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली होती, असेही अहमदच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सहा अपीलकर्त्यांपैकी फक्त दोघांनाच सरकारी वकिलांचे साक्षीदार म्हणून तपासण्यात आल्याची माहितीही वकिलाने न्यायालयाला दिली. अपीलकर्त्यांनी सादर केलेल्या तक्त्यात याचा उल्लेख नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, तुम्ही केलेला तक्ता गोंधळात टाकणारा आहे. तुम्हाला ते योग्यरीत्या पडताळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अपीलकर्त्यांनी सादर केलेली माहिती अपूर्ण असल्याचे नमूद करून न्यायालयाने सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.