खासगी वीज वितरण परवान्याबाबत सावध पावले!

खासगी वीज वितरण परवान्याबाबत सावध पावले!

Published on

खासगी वीज वितरण परवान्याबाबत सावध पावले!
अदाणी, टोरंटच्या प्रस्तावावरील सुनावणीवर निकालाची प्रतीक्षा
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महावितरणकडून राज्यात सर्वत्र वीजपुरवठा केला जात असला, तरी अदाणी इलेक्ट्रिसिटी, टोरंट पाॅवर आणि टाटा पाॅवरने समांतर वीज वितरण परवान्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) याचिका दाखल केली होती. अदाणी आणि टोरंटच्या याचिकेवर जनसुनावणी होऊन दीड महिना झाला, तरी अद्याप निर्णय आलेला नाही. टाटाच्या याचिकेवर तर अद्याप जनसुनावणीच झाली नाही. त्यामुळे वीज आयोगाने खासगी वीज वितरण कंपन्यांना महावितरणच्या कार्यक्षेत्रात वितरण परवाना देण्यासाठी ‘वेट ॲण्ड वाॅच’ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबई उपनगरात वीज वितरित केली जाते; मात्र आता मुंबईबाहेर ठाणे, नवी मुंबई, तळोजा आणि पनवेल क्षेत्रात वीज वितरण परवाना मिळण्यासाठी वीज आयोगाकडे याचिका दाखल केली होती. टोरंट पॉवरने वसई-विरार महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे महापालिका (वितरण फ्रँचायझी क्षेत्र वगळून), अंबरनाथ नगरपालिका, पालघर आणि वाडा तालुक्याच्या सभोवतालचे क्षेत्र, पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, रांजणगाव, चाकण, तळेगाव, कुरकुंभचा भाग, नागपूर जिल्ह्यातील कामठी, हिंगणा, मौदा आणि कळमेश्वर या क्षेत्रात वीज परवाना मिळावा म्हणून याचिका केली होती. त्यानुसार आयोगाने २२ जुलै रोजी अदाणी, तर ५ ऑगस्ट रोजी टोरंट पॉवरच्या याचिकेवर जनसुनावणी घेतली; मात्र त्यावर आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही.
---
टाटा पाॅवरला सुनावणीची प्रतीक्षा
टाटा पाॅवरला छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, जालना, वाळूंज एमआयडीसी, नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबक या तालुक्यात, तसेच ठाणे महापालिका, पनवेल महापालिका ते जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणदरम्यानचा संपूर्ण कॉरिडॉर आणि पुणे शहरासह हवेली, मुळशी, मावळ व खेड तालुक्यात वीज वितरण परवाना हवा आहे. त्यांनी जुलै महिन्यात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप जनसुनावणी झाली नाही.
---
महावितरणच्या मागणीने पेच
अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पाॅवर आणि टोरंट पाॅवरने विद्युत कायद्यातील तरतुदींचा आधार घेत समांतर वितरण परवाण्यासाठी अर्ज केला आहे. महावितरणनेही तीच री ओढत मुंबई शहर आणि उपनगरात समांतर वितरण परवाना मिळावा म्हणून वीज आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळेच वीज आयोगासमोर समांतरण परवान्याबाबत पेच निर्माण झाल्याचे मत वीजतज्ज्ञांनी व्यक्त केले.
---
वीज आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे वीज कंपन्यांनी दाखल केलेल्या समांतर वीज वितरण परवान्याच्या याचिका, त्यावर आलेल्या हरकतींचा विचार करतानाच, परवान्याच्या प्रत्यक्ष गरजेचा अभ्यास करून लवकर निर्णय घ्यायला हवा.
- डाॅ. अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ

Marathi News Esakal
www.esakal.com