नवरात्रोत्सवात ‘जीवदानी’वर तिसऱ्या डोळ्याची नजर
विरार, ता. १८ (बातमीदार) : लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून जीवदानी मंदिर ओळखले जाते. नवरात्रोत्सवात जीवधन गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिर परिसरात १६० सीसीटीव्हींच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर असणार आहे. त्याचबरोबर कोणताही घातपात होऊ नये, म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याबाबत बुधवारी (ता. १७) अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.
विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून भाविक गर्दी करतात. यात गुजरात, ठाणे, पालघर, भाईंदर, मुंबई, राजस्थान, कोकणमधील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर सुरक्षेचा आढावा दहशतवादविरोधी पथकानेसुद्धा (एटीएस) घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवचही उभारण्यात आले आहे. नऊ दिवस मंदिरात होणारी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे २०० एनसीसी विद्यार्थी हजर असणार आहेत, तर मंदिर ट्रस्टचे १०० सुरक्षा रक्षक त्यांना मदत करणार आहेत. त्याचबरोबर मंदिरात आणि मंदिराच्या खाली हत्यारबंद पोलिसांची तुकडी तैनात असणार आहे.
जीवदानी मंदिरात जाण्यासाठी असलेल्या फेनिक्युलरची चाचणीही यशस्वी झाली आहे. नवरात्रीवेळी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर ५० हजारांच्या आसपास भाविकांची गर्दी होणार आहे. रविवारी हाच गर्दीचा आकडा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्याचे असल्याचे प्रदीप तेंडोलकर आणि पंकज ठाकूर यांनी सांगितले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोमवारी (ता. २२) सकाळी श्री जीवदानी मातेला महाभिषेक, वस्त्रालंकार, शृंगार व नवचण्डी वाचन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर दिवशी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
वाहतूक मार्गात बदल होणार
नवरात्रोत्सवात गडावर भाविकांची गर्दी होणार असल्याचेही माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या वेळी वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहे, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.