अपंगांच्या आसनाला टायरचा अडथळा

अपंगांच्या आसनाला टायरचा अडथळा

Published on

दिव्यांगाच्या आसनावर टायरचा अडथळा
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
कल्याण, ता. १८ (बातमीदार) : एसटी महामंडळ प्रवासीसंख्येत वाढ करण्यासाठी विविध सेवा सुधारणा करत आहे; मात्र काही आगारांमधून मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. विठ्ठलवाडी एसटी आगारातून सुटणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या बसमध्ये, अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या आसनाजवळच बसचे जड टायर ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे ना केवळ अपंग प्रवाशांना त्रास होत आहे, तर आपत्कालीन परिस्थितीत इतर प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

एम.एच.२० बी.एल.२९९६ या क्रमांकाच्या एसटी बसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेले आसन क्रमांक तीन आणि चारच्या ठिकाणी, ७० ते ९० किलो वजनाचे जड टायर ठेवण्यात आले आहेत. ही बस दररोज पंढरपूर, इस्लामपूर, अहिल्यानगर अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावत असते. या बसमध्ये एकूण ३७ प्रवासी आसनांची क्षमता असून, त्यातील तीन ते सहा क्रमांकाची आसने दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असतात. त्याच ठिकाणी टायर ठेवण्यात आल्यामुळे दिव्यांगांना बसण्यास जागा उरत नाही. तसेच चाके हलली किंवा आपत्कालीन परिस्थितीत जागेवरून सरकली, तर गंभीर दुखापती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कार्यशाळेची हलगर्जी
बसच्या तळाच्या भागात ‘स्टोरेज कंपार्टमेंट’मध्ये अतिरिक्त चाक ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था असते; मात्र तांत्रिक अडचणींचे कारण देत वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी टायर प्रवासी आसनाजवळच ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून कार्यशाळेतील यंत्रणेच्या बेजबाबदारपणाचे स्पष्ट चित्र समोर येते.

प्रवाशांचा संताप, प्रशासनाकडून दुर्लक्ष
या प्रकाराबाबत काही जागरूक प्रवाशांनी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनीही सदर बाब मान्य केली, मात्र आठवडा उलटून गेला तरी ना चाक हलवण्यात आले, ना तांत्रिक अडचण दूर करण्यात आली. त्यामुळे ‘अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोणाची?’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

काय करायला हवे?
एसटी महामंडळाने सर्व लांब पल्ल्याच्या बसेसची तातडीने तपासणी करावी.
अपंगांसाठी राखीव आसनांवर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची खात्री करावी.
कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तातडीने दुरुस्त्या कराव्यात.
अपंग प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करणारी कारवाई करण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com