कोंडीवर ‘ई-बाईक टॅक्सी’ चा पर्याय
कोंडीवर ‘ई-बाइक टॅक्सी’चा पर्याय
वाहतूकतज्ज्ञांच्या संमिश्र प्रतिक्रिया; तीन कंपन्यांना प्राथमिक परवाना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः राज्य परिवहन प्राधिकरणाच्या १८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ई-बाइक टॅक्सीसेवेसाठी परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत भाडे एकसमान ठेवण्यास मान्यता देण्यात आली. ही सेवा सुरू करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात तीन कंपन्यांना प्राथमिक परवाना देण्यात आला असून, मंगळवारपासून (ता. १६) ही सेवा सुरू झाली आहे. ई-बाइक टॅक्सीसेवेमुळे वाहतूक कोंडी फुटेल का, याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी परिवहन मंत्रालयाने ई-बाइक टॅक्सीसेवेला परवानगी दिली आहे. मुंबईतील वाढत्या प्रवाशांची संख्या आणि त्या तुलनेत वाहतूक साधनांची कमतरता पाहता ही सेवा फायदेशीर ठरेल, असे बोलले जात आहे. ई-बाइक टॅक्सीचा वापर केल्याने कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास करता येईल, असे सांगण्यात येत आहे. काही जणांना वाहतूक कोंडी वाढण्याची भीती आहे. तसेच त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहणार असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. ई-बाइक टॅक्सीचालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.
मुंबईतील रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे, परंतु सध्याची परिस्थिती पाहता बेस्टची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच आता ई-बाइक टॅक्सीदेखील सुरू झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकींची संख्या वाढेल. कमी होण्याऐवजी वाहतूक कोंडीत भर पडेल. यातच रिक्षा-टॅक्सीचालकांना या सेवेचा फटका बसू शकतो. तसेच अडचणीत असलेल्या बेस्टलाही त्याची झळ सोसावी लागणार आहे. एकंदरीत वाहतूक कोंडीवर हा उपाय होऊ शकत नाही.
- ऋषी अगरवाल, संचालक, मुंबई सस्टिबिलीटी सेंटर
मुंबईत सुरू झालेली ई-बाइक टॅक्सीसेवा लहान अंतरासाठी सोयीची ठरू शकते. कोंडी कमी करण्यास मदत होईल. तसेच वाहनांमधून निघणारा धूर घटल्याने प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल, मात्र महिलांसाठी रात्री सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि बाइक हा रस्त्यावर सर्वात असुरक्षित प्रवासाचा प्रकार असल्याने अपघाताचा धोका कायम राहतो. त्यामुळे ही सेवा केवळ पूरक ठरेल, मुख्य सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय ठरणार नाही.
- सुशील पठारे, वाहतूक अभ्यासक
मुंबईतील बेस्ट बस वाहतूक पाहता नागरिकांना ई-बाइक टॅक्सीच्या माध्यमातून वाहतुकीचा पर्याय निर्माण होईल. रिक्षा-टॅक्सीचा प्रवासीवर्ग दुचाकीकडे वळेल. रिक्षा-टॅक्सीच्या तुलनेत ई-बाइक टॅक्सीला कमी जागा लागत असल्याने कोंडी होणार नाही, परंतु हा प्रवास सुरक्षित आहे का, असा प्रश्न आहे. हेल्मेट असो किंवा वाहतूक नियमांचे पालन, याकडे ई-बाइक टॅक्सीचालक दुर्लक्ष करतात.
- अजय गोवले, वाहतूकतज्ज्ञ
मुंबईतील वाहनांची संख्या
बेस्ट बस - ३,५००
दुचाकी - २७ लाख
कार - १४ लाख
इलेक्ट्रिक दुचाकी - २२ हजार
इलेक्ट्रिक कार - १२ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.