खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू अपघातांचे प्रकरण

खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू अपघातांचे प्रकरण

Published on

अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करा!
खड्ड्यांबाबत न्यायालयाची सरकारसह पालिकांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः मुंबई महानगर परिसरात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देणारे धोरण तयार करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि सर्व पालिकांना केली. तसेच अपघातांसाठी कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्यासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याबाबत विविध प्राधिकरणांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याच्या कृतीवरही न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. राज्यातील खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू आणि जखमींसाठी धोरण आणता येऊ शकते का, कंत्राटदारांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरावे. तसचे पालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करावी. हा दंड किरकोळ नसावा. त्यांना अद्दल घडली पाहिजे, असेही खंडपीठाने सुनावले. तसेच पालिका अधिकाऱ्यांना निकृष्ट कामासाठी कंत्राटदारांना जबाबदार धरण्यास आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रातील खड्डे एका आठवड्यात दुरुस्त करण्याचे आदेश देऊन सुनावणी तहकूब केली.
----
मुंबई पालिका क्षेत्रात केवळ ६८८ खड्डे
मुंबई महापालिका क्षेत्रात केवळ ६८८ खड्डे शिल्लक असल्याची माहिती ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी खंडपीठाला दिले. पालिकेच्या अखत्यारित २०५० किमीचे रस्ते असून, त्यापैकी १,५७५ किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले, तर ३५० किमी रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. पालिकेकडे खड्ड्यांबाबत तक्रारी येताच ४८ तासांत दुरुस्ती केली जाते. त्यानुसार १५,५२६ तक्रारी आल्या असून, ११,८०८ खड्डे बुजवले. एकूण २७,३३४ खड्ड्यांपैकी केवळ ६८८ खड्डे दुरुस्त करणे शिल्लक असून, ४८ तासांत तेही बुजवले जातील, असेही साखरे यांनी सांगितले.
----
खड्डे पडतातच का?
तुम्ही बांधलेल्या रस्त्यांवर एकाच पावसात खड्डे का पडतात, कंत्राटदारांवर तुम्ही काय कारवाई करता, अशी विचारणा खंडपीठाने केली. गेल्या काही वर्षांत एकही खड्डा पडला नाही असा रस्ता दाखवा, असे न्यायालयाने विचारले असता उच्च न्यायालयाबाहेर, असे मिश्किल उत्तर साखरे यांनी दिले.
---
यंदा सहा जणांचा मृत्यू
यंदाच्या पावसाळ्यात मुंबई आणि एमएमआरमध्ये खड्ड्यांमुळे सहा मृत्यू झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामध्ये भिवंडी-निजामपूरमध्ये तीन आणि ठाणे, कल्याण आणि मुंबईत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झाल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com