पावसामुळे पपनसाच्या उत्पादनात घट
पावसामुळे पपनसाच्या उत्पादनात घट
गळ, कीड रोगावर संशोधनाची मागणी; बागायतदारांची चिंता वाढली
मुरूड, ता. २१ (वार्ताहर) : कोकणातील पारंपरिक फळांमध्ये पपनसाला विशेष स्थान आहे. विशेषतः गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि गौरी पूजनाच्या काळात या फळांना मोठी मागणी असते; मात्र गेल्या काही वर्षांपासून पपनसाच्या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असून यंदा अतिवृष्टी, गळरोग आणि माकडांच्या उच्छादामुळे पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी, उत्पादनात जवळपास ५० टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पूर्वी रायगड जिल्ह्यातील मुरूड, अलिबाग, रेवदंडा, भोईघर आणि नांदगाव परिसरात प्रत्येक वाडीत पपनसाची झाडे सहज दिसत होती. आता ती मोजकीच शिल्लक आहेत. संपूर्ण मुरूड तालुक्यात पपनसाच्या झाडांची संख्या अवघी २५० ते ३०० इतकी असल्याचे स्थानिकांचा अंदाज आहे. नवीन लागवड होत नसल्याने पुढील काही वर्षांत हे प्रमाण आणखी घटण्याची चिन्हे आहेत. पपनसाच्या झाडाला साधारणतः ५० ते ६० फळे धरतात. प्रत्येक फळाला बाजारात ८० ते १०० रुपये दर मिळतो. सणांच्या काळात दर आणखी वाढतात. एका झाडापासून बागायतदारांना सरासरी तीन ते चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. तरीसुद्धा झाडांची मोठी जागा व्यापणारी रचना, गौरी-गणपती व्यतिरिक्त बाजारपेठेतील मर्यादित मागणी आणि सरकारी अनुदानाचा अभाव, यामुळे शेतकरी नवीन लागवडीस धजावत नाहीत. दरम्यान, अलीकडच्या सततच्या पावसामुळे पपनसाच्या फळांवर कीड व गळरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दमट हवामानामुळे तयार फळांवर अळ्या व किडींचा हल्ला होऊन ती अकाली गळून पडतात. या समस्येवर संशोधनाची आवश्यकता असल्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. काकळघर व भोईघर येथील काही बागायतदार अजूनही ही झाडे जपून ठेवत आहेत; मात्र पिकाचे संरक्षण करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
...................
कृषितज्ज्ञांच्या मते, पपनसावर प्रक्रिया उद्योग विकसित करण्याची गरज आहे. कोकम, आंबा, फणस यांसारख्या फळांप्रमाणेच पपनसावरून रस, जॅम, मुरांबा यांसारखे पदार्थ तयार केले जाऊ शकतात. पचनशक्ती वाढविणारे, जीवनसत्त्व सी व बी-६, प्रथिने, पोटॅशियम आणि खनिजांनी परिपूर्ण असल्याने या फळाचे पोषणमूल्यही मोठे आहे. कृषी विभागाने आतापर्यंत आंबा, काजू, नारळ व सुपारी पिकांना अनुदान दिले असले तरी पपनस या यादीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी आधार मिळत नाही. मुरूड तालुका कृषी अधिकारी मंदार नरले यांनीही याची पुष्टी केली. पपनसाच्या सुधारित जातीची लागवड आणि संशोधनाला चालना मिळाल्यास या बहुगुणी फळाचे उत्पादन व उत्पन्न वाढू शकेल, असा विश्वास बागायतदारांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.