अलिबागच्या मासळी मार्केटचे काम युद्धपातळीवर
अलिबागच्या मासळी मार्केटचे काम युद्धपातळीवर
मासळी विक्रेत्यांना मिळणार सुसज्ज, स्वच्छ इमारत
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) ः शहरातील पीएनपीनगर येथे असणाऱ्या मासळी मार्केटचे काम गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी रखडलेले होते; मात्र आता पुन्हा एकदा मासळी मार्केटमध्ये बांधण्यात येणाऱ्या दुमजली इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोळी महिलांना मासेविक्री करण्यासाठी हक्काची व स्वच्छ जागा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील पीएनपीनगर येथे असणाऱ्या मासळी मार्केटची इमारती जुनी व मोडकळीस आली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. त्याचप्रमाणे या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने कोळी भगिनी या बाहेरील रस्त्याच्या कडेला बसून मासळी विक्री करीत होत्या. त्यामुळे या ठिकाणी गर्दी व अस्वच्छतेचे साम्राज्यही पसरले होते. आता नवीन इमारत ही दुमजली बांधण्यात येणार आहे. या इमारतीत जास्तीत जास्त कोळी भगिनींना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरील रस्त्यावर होणारी गर्दी कमी होऊन ग्राहकांनाही समाधान मिळणार आहे. या इमारतीचे काम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते; मात्र त्यानंतर पावसाळा व निवडणुकांची आचारसंहिता, स्थानिक मासेविक्रेत्यांचा विरोध यामुळे काम रखडले होते. आता स्थानिकांचा विरोध मावळल्यानंतर सुमारे एक कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात येणार आहे. नुकतेच या इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू करण्यात आले आहे.
नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये मासेविक्री करणाऱ्या महिलांसह खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छ शौचालयदेखील बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ड्रेनेजची सोयही करण्यात येणार आहे. यामुळे मासळी धुतल्यानंतर ते पाणी रस्त्यावर टाकण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे अस्वच्छता कमी होण्यास मदत होणार असून दुर्गंधीदेखील पसरणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
......................
चौकट
कचऱ्यासाठी ओडब्ल्यूसी मशीन
मच्छी मार्केटमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यात येणार आहे. यासाठी ओडब्ल्यूसी (ऑरगॅनिक वेस्ट मशीन) मशीन घेण्यात येणार आहे. यामुळे हा कचरा टाकण्याचा अथवा त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
...................
प्रतिक्रिया
काही कारणांमुळे काम रखडले होते; मात्र आता काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून मच्छीविक्रेत्या महिलांना त्रास होणार नाही. या ठिकाणी उभारण्यात येणारी इमारत ही सर्वसमावेशक असून सर्व महिलांना जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनाही त्रास होणार नाही.
- सचिन बच्छाव, प्रशासक तथा मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद
............
या इमारतीचे काम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. काही कारणांमुळे काम रखडले. दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात येणार आहे. लवकरच काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
- संतोष मुंढे, नगर अभियंता, अलिबाग नगर परिषद