गांजाडींचा अड्डा बनलेलं सार्वजनिक शौचालय

गांजाडींचा अड्डा बनलेलं सार्वजनिक शौचालय

Published on

गांजाडींचा अड्डा बनलेलं सार्वजनिक शौचालय
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरः प्रभाग १४ मधील शौचालयाची दुरवस्था
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक १४ मधील भीमनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तुटलेले दरवाजे, खिडक्या, वीजपुरवठ्याचा अभाव आणि सर्वत्र घाण असून नशेखोरांनी शौचालयाला अड्डा बनवला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी मनसे नेते सचिन कदम यांनी स्वतः पाहणी करत पालिकेला कठोर इशारा दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील भीमनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या शौचालयाचा ताबा गर्दुल्लांच्या टोळक्यांनी घेतला असून येथे पार्ट्या रंगू लागल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. एक महिला बाहेर पहारा देत असताना शौचालयाचा वापर करावा लागतो. या घटनेने पुन्हा एकदा पालिकेच्या निष्क्रिय कारभाराकडे बोट दाखवले आहे. सार्वजनिक शौचालयांसारख्या प्राथमिक गरजांच्या सोयींचे व्यवस्थापनही पालिकेकडून होत नसेल, तर इतर मूलभूत विकासकामांची स्थिती काय असेल? असा प्रश्न नागरिकांनी उपास्थित केला आहे.

दुर्घटनेची भीती
चारही बाजूंनी कोसळलेले प्लास्टर, दरवाजे-खिडक्या नसणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि घाणीचे साम्राज्य या सर्व कारणांमुळे शौचालय वापरणे असुरक्षित झाले आहे. तर, येथे गंभीर अपघात घडू शकतो, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

आंदोलनाचा इशारा
या पार्श्वभूमीवर मनसे नेते सचिन कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या शौचालयाची पाहणी केली. त्वरित दुरुस्तीचे आदेश न दिल्यास कठोर आंदोलनाचा इशारा पालिकेला दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून महिलांच्या सन्मानाचा प्रश्न डावलला तर आंदोलनाचा भडका उडेल, अशी चेतावणी दिली आहे.

या सार्वजनिक शौचालयाची अवस्था पाहून मन खिन्न झालं. दरवाजे-खिडक्या तुटलेल्या, वीजपुरवठा बंद, सर्वत्र घाण आणि त्यात गांजाडींचा अड्डा झाला हे. आम्ही हा प्रश्न हलक्यात घेणार नाही. शौचालयाची दुरुस्ती, साफसफाई आणि सुरक्षेची हमी देण्यात आली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल. महिलांचा सन्मान व नागरिकांचे आरोग्य यावर तडजोड केली जाणार नाही.
- सचिन कदम, मनसे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com