माथेरानमधील घोड्यांना दृष्टीदोष

माथेरानमधील घोड्यांना दृष्टीदोष

Published on

पर्यटनगरीवर चिंतेचे ढग
माथेरानमधील अकरा घोड्यांना विचित्र रोगाची लागण
अजय कदम ः सकाळ वृत्तसेवा
माथेरान, ता. २० ः प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या घोड्यांना विचित्र रोगाची लागण झाली आहे. आठवड्याभरात माथेरामधील ११ घोडे या आजाराने त्रस्त झाले असून पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी नवे संकट आल्याने संपूर्ण पर्यटनगरीवरच चिंतेचे ढग दाटले आहेत.
रायगड जिल्ह्यात माथेरान येथे पर्यटन व्यवसायासाठी घोडे जातात. त्यानंतर अलिबाग, काशिद, मुरूड, दिवेआगर येथे घोडसवारी हा पर्यटन व्यवसायाचा मुख्य भाग आहे. अशातच मागील काही दिवसांपासून घोड्यांना विचित्र आजाराने हैराण केले आहे. या आजारामुळे अंधुक दिसत असल्यामुळे घोडे बिथरत असून लाथा मारून तबल्याचे नुकसान करीत आहेत. तसेच समोरचे काहीच दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांबरोबर अश्वपालकांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी माथेरानमधील घोड्यांना असा आजार झाला नसल्याचे येथील अश्वपालकांचे म्हणणे आहे. पुणे येथील अश्वसेवा संस्थेने माथेरानमधील घोड्यांची तपासणी केली असून त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच आजाराचे निदान होणार आहे.
-----------------------------------------------
पर्यटनाच्या हंगामाला फटका
सुरुवातीला घोड्यांचे डोळे राखाडी रंगाचे होतात. मग पिवळे दिसतात आणि मग लाल होतात. ही संपूर्ण प्रक्रिया तीन दिवसांत म्हणजे ७२ तासांत होते. तर पुढील चार ते पाच दिवसांत घोड्याला दिसणे बंद होते. घोड्याला दिसेनासे झाल्यावर तबेल्यामध्येच घोडा उड्या मारणे, टापा उचलत तोडफोड करत आहे. विशेष म्हणजे, या आजारावरील उपचार हे खर्चिक असल्याने आर्थिक भुर्दंड अश्वपालकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
--------------------------------------------
माथेरानचे अर्थकारण कोलमडणार
घोड्यावर फिरण्यासाठी माथेरानमध्ये देश-विदेशातून लाखो पर्यटक माथेरानमध्ये येतात. लाल मातीचे रस्ते, त्यातून ऐटीत चालणारा घोडा दौडत नेण्याची मजा औरच आहे. सध्या माथेरानमध्ये पर्यटन हंगाम नसल्यामुळे पर्यटक संख्या फार कमी आहे. त्यामुळे घोडे हे तबेल्यातच बांधून आहेत. माथेरानमधील ४० टक्के कुटुंबांचा घोड्याच्या व्यवसायावर उदरनिर्वाह होतो.
-------
पशुवैद्यकीय दवाखाना कागदावर
माथेरानमध्ये पशुवैद्यकीय श्रेणी एक हा दवाखाना आहे; पण आजतागायत बंद आहे. जूनपर्यंत या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध होते; पण सध्या सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. घोड्यांबाबत आजाराविषयी समजल्यानंतर एक डॉक्टर येऊन उपचार करून गेले; पण आता जास्त घोड्यांना लागण झाली असताना एकही डॉक्टर उपलब्ध असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षाविरोधात नाराजी आहे.
------
आजाराची लक्षणे
डोळ्यांवर सूज येते
डोळ्यांचा रंग बदलणे
अंधुक दिसणे
७२ तासांत प्रसार
पाचव्या दिवशी आंधळेपणा
-------
काही दिवसांपासून या विचित्र आजाराने घोडे हैराण आहेत. अंधुक दिसत असल्यामुळे घोडे बिथरल्यासारखे वागत आहेत. तबेल्यांचे नुकसान होत असून काय करावे सुचत नाही. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच नसल्याने काळजी वाढली आहे.
- निधी जाधव, अश्वपालक
-----
माथेरानमध्ये घोड्यांना आजार झाल्याचे समजताच अश्वसेवा संस्थेकडून घोड्यांची तपासणी करण्यात आली. त्यांची दृष्टी अंशतः जाऊन अंधुक दिसायला लागते. या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
- डॉ. अनिल लहाने, संस्थापक अश्वसेवा संस्था, पुणे
------
आजार कोणत्या प्रकारचा आहे, याबाबत तपासणी करीत आहोत. त्याचबरोबर त्याचा फैलाव होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. घाबरण्याचे कारण नाही. डॉक्टरांनी तिथे जाऊन उपचार केले. त्यातील एका घोड्याला दिसू लागले आहे. डॉक्टर उपलब्ध होतील त्यानुसार माथेरानमध्ये नेमणूक केली जाणार आहे.
- डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, रायगड विभाग
----------------------------------------
माथेरानधील घोड्यांची संख्या
परवानाधारक - ४६०
मालवाहतूक - ३००

Marathi News Esakal
www.esakal.com