१८ तासांच्या बंदीने घुसमट
१८ तासांच्या बंदीने घुसमट
ठाण्यातील प्रवेशबंदीमुळे पनवेलमध्ये कोंडी, वाहतूकदारांना फटका
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २० (बातमीदार)ः अवजड वाहनांना ठाणे शहरात १८ तासांची प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम पनवेल, जेएनपीएच्या वाहतूक व्यवस्थेवर पडला असून वाहतूक कोंडीबरोबर चालक, वाहक, माथाडी कामगारांवर परिणाम झाला आहे.
जेएनपीएतून उत्तरेकडील राज्यात आयात-निर्यात करण्यासाठी मालाची वाहतूक करणारे हजारो वाहने रोज ये-जा करतात. बहुतांश वाहने गुजरातमार्गे राजस्थानसह इतर राज्यांमध्ये जातात. कळंबोली स्टील मार्केटमध्येही विविध राज्यांमधून स्टील वाहतुकीसाठी वाहने येतात. या सर्व वाहनांना ठाण्यामधून जावे लागते. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणे परिसरामध्ये कोंडी उद्भवत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत सकाळी सहा ते रात्री बारादरम्यान ठाण्यात अवजड वाहनांना बंदीची अधिसूचना जारी केली. त्यामुळे २४ तासांतील १८ तास अवजड वाहने रस्त्यांवरच उभी असल्याने पनवेलकरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.
-------------------------------------
कोंडीची ठिकाणे
- पनवेल-जेएनपीए महामार्गावर दोन्ही बाजूने कंटेनर, ट्रक, ट्रेलर, टँकर उभे केले जात आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यांवरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जाता येत नाही. टी पॉइंट ते कळंबोली सर्कलदरम्यानही वाहने उभी केली जात आहेत.
- कामोठे परिसरातील पनवेल-सायन महामार्गावर अशीच स्थिती आहे. पनवेल-मुंब्रा महामार्गावर ट्रेलर उभे आहेत. कळंबोली स्टील मार्केटमधील फेरी रोडवर दिवसभर अवजड वाहने उभी राहतात. त्यामुळे कळंबोली वसाहतीतील अंतर्गत रस्ते व्यापले गेले आहेत.
------------------------------
वाहतूक बंदीविरोधात रोष
- सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ठाणे शहरातून वाहतुकीला मनाई करण्यात आल्यामुळे गुजरात राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना एकाच जागेवर थांबावे लागते. त्यामुळे इच्छितस्थळी माल वेळेवर पोहोचत नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष गोविंद साबळे आणि रायगड जिल्हा सचिव कृष्णा ढोमे यांनी केली आहे.
- ठाणे वाहतूक शाखेने काढलेल्या अधिसूचनेविरोधात जेएनपीएतील सर्व वाहतूक संघटनांनी एकत्रित येऊन पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांची शुक्रवार (ता. १९) भेट घेतली. या निर्णयामुळे व्यवसायावर परिणामाचा पाढा वाचला. ठाणे शहरातील बंदीबाबत हरकत घेतली. तसेच रात्री १० ते सकाळी सहा, दुपारी ११ पासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाहने चालवण्याची मागणी केली.
------------------------
हजार कोटींचा फटका
- या मार्गांवर दररोज पाच हजारपेक्षा जास्त वाहने धावतात. बंदीमुळे आयात-निर्यातीसह वाहतूकदारांना हजारो कोटींचा फटका बसणार आहे. अशातच माल इच्छीतस्थळी वेळेत पोहोचला तर हजारो रुपयांचे विलंब शुल्क लागते.
- महाराष्ट्राच्या सीमेलगत दमन, सिल्वासा या केंद्रशासित प्रदेश असल्याने येथे कर कमी आहेत. त्यामुळे येथे औषध व मद्यनिर्मिती करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणच्या उद्योगांना लागणारा कच्चा माल जेएनपीए बंदरातून या ठिकाणी पाठवला जातो.
- तळोजा औद्योगिक वसाहत, कळंबोली लोखंड पोलाद बाजारामधून ठाणे, भिवंडी, शहापूर येथे मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होते. हा माल भरण्यासाठी माथाडी कामगारांचा उपयोग केला जातो. प्रवेश बंदीमुळे वाहतूकदार माल भरण्यास अनुच्छुक आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
---------------------------------
जेएनपीएतून मालवाहतूक ठाणेमार्गे उत्तरेकडील राज्यात होते. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करीत जावे लागते. आता १८ तासांच्या प्रवेशबंदीच्या एकतर्फी निर्णयामुळे व्यवसायावर परिणाम झाला. त्यानुसार सर्व संघटनांनी हरकत घेतली आहे.
- भरत पोखरकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.