हजेरी घोटाळा शिक्षकाला नडला

हजेरी घोटाळा शिक्षकाला नडला

Published on

जव्हार, ता. २० (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा महाविद्यालयातील शिक्षकाला हजेरी घोटाळा करणे चांगलेच महागात पडले आहे. जव्हार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माया मथुरे यांनी त्याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे दांड्या मारल्यानंतरही मस्टरमध्ये फेरफार करणारे शिक्षक, तसेच अन्य आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील दहिवडी महाविद्यालयातून रामचंद्र गवळी यांची मोखाडा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात बदली झाली होती. कार्यमुक्ती आदेश मिळूनही ते मोखाडा महाविद्यालयात तब्बल तीन महिन्यांनंतर रुजू झाले होते. असे असताना मागील ५३ दिवसांच्या गैरहजर काळातील हजेरीपटावर सह्या करून पगार घेतल्याचा आरोप संस्थेने केला होता. ही बनावगिरी महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन प्राचार्य रमेश भोर यांनी मोखाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.

१३ वर्षांनंतर निकाल
महाविद्यालयाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवून न घेता विभागीय चौकशी करण्याची सूचना केली. त्यानंतर संस्थेने आरोपीविरुद्ध चौकशी समिती नेमली असता गवळी यांच्याविरोधातील आरोप खरे असल्याचे आढळून आले. त्यामुळे महाविद्यालयाने जव्हार न्यायालयात गवळी यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्याचे कामकाज सुमारे १३ वर्षे चालले.

Marathi News Esakal
www.esakal.com