अवजड बंदीचा पुन्हा फज्जा
अवजड बंदीचा पुन्हा फज्जा
निर्णय मागे; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नवे आदेश
ठाणे शहर, ता. २० (बातमीदार) : जड-अवजड वाहतुकीला रोज १८ तासांची घातलेली बंदी एका दिवसात मागे घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच वाहतूक विभागाकडून घेण्यात आलेला हा बंदीचा आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करत जड-अवजड वाहनांची वाहतूक सहा तासांवरून १२ तासांवर वाढवली आहे. या बदलामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होतानाच चिंतेत झालेल्या व्यापारीवर्गालादेखील दिलासा मिळाला आहे. आता दसरा, दिवाळीच्या सणासाठी देश-विदेशातून मागविलेला माल वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच गुरुवारी (ता. १८) पासून ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीच्या शहरांमधून उरण येथील जेएनपीए बंदरामधून गुजरात, पालघर, वसई, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी जाणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला १८ तासांची बंदी घालण्यात आली होती. या मार्गांवरून रोज रात्री १२ ते सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली होती; मात्र शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय प्रशासनाच्या अंगाशी आल्याचे दिसून आले. जेएनपीए बंदर आणि गुजरातमधून रोज बाहेर पडलेल्या जड-अवजड वाहनांना रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागेवर वाहन पार्क करावे लागत होते.
शहरांच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गांवर ही वाहने पार्क करण्यासाठी पुरेशा जागा उपलब्ध नसल्याने कामगारवर्ग कामावर जाण्या आणि येण्याच्या वेळेत तेथे मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली होती. तसेच जास्त वेळ वाहनांत नाशवंत माल पडून राहत असल्याने त्याचे नुकसान होत होते. तसेच सण- उत्सवासाठी मागवलेला माल कंपनी, बाजारपेठांत पोहोचायला विलंब होऊ लागल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले होते. ही बाब ‘सकाळ’ने (ता. १८)च्या अंकात प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत रोज सहा तास जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत ठाणे वाहतूक विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते; मात्र या आदेशाने वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी त्यात मोठी वाढ झाली होती. शिवाय, व्यापाऱ्यांनीदेखील चिंता व्यक्त केली होती; मात्र यात बदल केले असून आता ही वाहतूक दोन टप्यात सहा-सहा तासांच्या सत्रात सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जड-अवजड वाहतूक रोज सकाळी ११ ते सायंकाळी पाच आणि रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील, असे नवे आदेश शुक्रवारी (ता. १९) काढले आहेत.
उपविभागातील मार्गावर असणार बंदी
भिवंडी - १) पारोळ फाटा (नदी नाका) २) धामणगाव, जांभोळी, पाइपलाइन नाका व चाविंद्रा नाका
कोनगाव - सरवली गाव (बासुरी हॉटेल)
कल्याण - १) बापगाव, गांधारी चौक २) म्हारळ जकातनाका
अंबरनाथ - १) खरवई नाका २) एरंजाड
कोपरी - आनंदनगर चेकनाका
कासारवडवली - नीरा केंद्र, गायमुख घाट
वागळे - मोडेला चेकनाका
नारपोली - ७२ गाळा, चिंचोटी-वसई रोड
(सर्व अवजड १० चाकी आणि त्यापेक्षा जास्त चाके असलेल्या वाहनांना हा बंदीचा आदेश आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.