सागरी किनारी पर्यावरणाची साद
वसई, ता. २० (बातमीदार) : समुद्र व किनारी जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे; मात्र वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. सागरी किनारे स्वच्छ असावेत, यासाठी वसई-विरार महापालिकेने शनिवारी (ता. २०) वसई सुरुची बाग समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम हाती घेतली. हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ३५ ते ४० टन कचरा गोळा करण्यात आला.
जागतिक किनारपट्टी स्वच्छतादिनाचे औचित्य साधून महापालिकेने केलेल्या आयोजनात ‘मेकिंग द डिफ्रेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेच्या सहकार्य लाभले. स्वच्छतेविषयी जनजागृती करत पथनाट्य, एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, एनएसएसचे स्वयंसेवक, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवकांनी किनारी असलेले प्लॅस्टिकचे ढीग, बॅग, कपडे यासह अन्य कचरा एकत्रित केला व महापालिकेच्या वाहनांत जमा करण्यात आला.
जागतिक महासागर, जलमार्ग जतन आणि संरक्षण करण्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छतादिनाचे औचित्य साधून प्रशासनाने उपक्रम हाती घेतला होता. सागरी परिसंस्था असुरक्षित होणे, जलप्रदूषण वाढणे, अस्वच्छ सागरीकिनारे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. हे टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जागर करण्यात आला.
आयुक्तांनी केली साफसफाई
वसई-विरार आयुक्त मनोज सूर्यवंशी यांनी विद्यार्थी, शिक्षकांशी उपक्रमावेळी संवाद साधत ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे व पर्यावरणाचे महत्त्व विशद केले व किनारी साफसफाई करीत कचरा जमा केला. त्यामुळे नागरिकांना प्रोत्साहन मिळाले.
अंध असूनही उघडले नागरिकांचे डोळे!
आपली वसई सुंदर दिसावी, यासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. कचरा सार्वजनिक ठिकाणी भिरकावू नका, तर योग्य कचराकुंडीत जमा करावा. अस्वच्छतेमुळे आजार बळावतात. सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे प्रदूषणमुक्त वसईसाठी प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचा ध्यास घेतला, तर आरोग्यमय, स्वच्छंदी वातावरणाचा आनंद घेता येणे शक्य होईल, असे महाविद्यालयातील अंध विद्यार्थी साहील डाबरे याने सांगितले.
केवळ एक दिवस नव्हे, तर स्वच्छ किनारे मोहीम सातत्याने राबविण्याचा मानस आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना मनसोक्त समुद्रकिनारी भटकंती करण्याचा आनंद मिळेल व पर्यावरणसंवर्धन मोहिमेला यश येईल. यासाठी विशेष मोहीम आखली जाणार आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.