समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी ‘रोबोटिक वॉटर रेस्क्यू’
समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी ‘रोबोटिक वॉटर रेस्क्यू’
पालिकेकडून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू; भारतीय बनावटीच्या यंत्रावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर पाण्यात बुडून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडतात. पोहण्याचा मोह, भरती-ओहोटीचा चुकीचा अंदाज तसेच विसर्जनाच्या काळात होणारी गर्दी यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो. या दुर्घटनांमध्ये बचावकार्याचा जीवरक्षकांवर मोठा भार पडत होता. आता त्यांना तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर रेस्क्यू’ यंत्र आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पालिकेकडून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, भारतीय बनावटीच्या यंत्रावर भर देण्यात आला आहे.
महापालिकेच्या अखत्यारीत सध्या गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या सहा प्रमुख चौपाट्यांवर १११ जीवरक्षक तैनात आहेत. या चौपाट्यांवर दरवर्षी अनेकांचा बुडून मृत्यू होते. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने प्रत्येकी एका चौपाटीवर एक अशा प्रकारे सहा ‘रोबोटिक वॉटर रेस्क्यू’ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे यंत्र खरेदीसाठी आधी काढलेल्या निविदेत स्वित्झर्लंडमधील कंपनी पात्र ठरली होती; मात्र त्यात तुर्की तंत्रज्ञानाचा वापर असल्याने त्याला विरोध झाला. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकला तुर्कीने दिलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर तुर्की उत्पादनांवर बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेवर या खरेदीबाबत टीका झाली होती. अखेर हे कंत्राट रद्द करून भारतीय बनावटीच्या यंत्रांचा समावेश असलेल्या नव्या निविदा प्रक्रियेचा मार्ग निवडण्यात आला आहे.
बुडणाऱ्याला आधार
‘रोबोटिक वॉटर रेस्क्यू’ यंत्र समुद्रात बुडणाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी जीवरक्षकांना मदत करेल. बुडणारी व्यक्ती आढळल्यास रिमोटच्या सहाय्याने रोबोट थेट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर तो रोबोट बुडणाऱ्याला आधार देऊन किनाऱ्यावर सुरक्षितरीत्या आणेल. या रोबोटची वहन क्षमता जास्त असून, तो समुद्रात प्रतितास १८ किमी वेगाने परिचलन करू शकतो. साधारण ८०० मीटरपर्यंत आणि त्याहून अधिक अंतरावर तो कार्यरत राहू शकतो. एकदा चार्ज केल्यावर सुमारे एका तासापर्यंत हे यंत्र वापरता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.