तळोज्यात पाण्यासाठी टाहो
तळोज्यात पाण्यासाठी टाहो
आसावरी सोसायटीतील रहिवाशांचा सिडकोविरोधात संताप
खारघर, ता. २० (बातमीदार) : पाणी द्या नाही तर घरे परत घ्या आणि आमचे पैसे परत द्या, अशा आशयाचे फलक तळोजा सेक्टर २७ मधील आसावरी गृहनिर्माण सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर झळकत आहेत. चार वर्षांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याला कंटाळलेल्या रहिवाशांनी अखेर सिडकोचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
आसावरी गृहप्रकल्पात तब्बल ५० इमारती आणि ४,८३५ सदनिका असून, हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही आणि हेटवणे धरण ओसंडून वाहत असूनही सोसायटीत पाणीटंचाई कायम आहे. नागरिकांना दिवसाआडच पाणी मिळते, तेही अत्यंत अपुरे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी निषेधाचे फलक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावून सिडको प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
................
सिडको भवनवर मोर्चा
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी (ता. १८) आसावरी सोसायटी क्र. २ मधील शेकडो रहिवाशांनी सिडको भवनवर मोर्चा काढला. या मोर्चात राहुल निर्मल, रवींद्र गवळी, श्रीनिवास कुलकर्णी, नीलेश माने, अभिजित धुमाळ, सुरेश बडे, संजय पोखरकर, शोभा देवरे, मोनाली मणेर, ज्योती सांगळे यांच्यासह २०० हून अधिक सदनिकाधारक सहभागी झाले होते. लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेत आंदोलनकर्ते तीन तास सिडको भवनच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन बसले होते.
.................
सिडकोकडून दिलेले आश्वासन
मोर्चादरम्यान सिडकोच्या मुख्य अभियंता शीला करुणाकरन, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता पी. एम. सेवटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची रहिवाशांसोबत बैठक झाली. या वेळी आसावरी संकुलाच्या मागील बाजूस असलेली जलवाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे तसेच गेट क्र. ५ पासून टाकी क्र. २ला नवीन नळजोडणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. हे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिवाय सर्व भूमिगत पाण्याच्या टाक्यांची पाहणी करून तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्याचे वचनही सिडकोने दिले. तोपर्यंत पाणीटंचाई जाणवल्यास टँकरद्वारे पुरवठा करण्याचीही हमी देण्यात आली.
..............
नागरिकांचा इशारा
मोर्चाचे मुख्य प्रवर्तक राहुल निर्मल म्हणाले, की आसावरी सोसायटी क्र. २ मधील रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आम्ही ‘घरे परत घ्या आणि पैसे परत द्या’ असे फलक लावले आहेत. लेखी आश्वासन मिळाले असले तरी सिडकोने ते पाळले नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.