प्रवेशाचा नवा पॅटर्न : चार वर्षांत एसएनडीटीत मुलींच्या प्रवेशाचा उच्चांक

प्रवेशाचा नवा पॅटर्न : चार वर्षांत एसएनडीटीत मुलींच्या प्रवेशाचा उच्चांक

Published on

‘एसएनडीटी’त प्रवेशाचा उच्चांक
पदवी, पदव्युत्तरचे प्रवेशात दुपटीहून अधिक वाढ
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना एसएनडीटी विद्यापीठातील मुलींच्या प्रवेशाने मागील चार वर्षांत प्रवेशांचा नवा उच्चांक गाठला आहे. केवळ मुंबईच नव्हे तर विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी इतर विद्यापीठांपेक्षा मुलींनी एसएनडीटीला पसंती दर्शविली आहे. गेल्या चार वर्षांत प्रवेशाची संख्या दुप्पट झाली आहे.

देशभरात महिलांसाठी शिक्षण उपलब्ध करून देणारे ११० वर्षांपूर्वी स्थापन झालेले पहिले महिला विद्यापीठ म्हणून ‘एसएनडीटी’ची ओळख आहे. देशातील सात राज्यांत या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. या विद्यापीठात राज्यातील शहरी ते ग्रामीण भागातील मुलींना नियमित आणि दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण ‍उपलब्ध करून दिले जाते. सध्या विद्यापीठाची ३७ विभाग, १३ उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठाशी ३८४ महाविद्यालये संलग्न आहेत. एसएनडीटीत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांत पदवीचे ४३ हजारांहून अधिक तर पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमांना साडेचार हजारांहून अधिक अशा एकूण ४८ हजार ३७ मुली शिक्षण घेत होत्या. गेल्या चार वर्षांत ही संख्या दुपट्टीवर गेली असून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ही संख्या ८४ हजारांवर पोहोचली आहे. तर यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील प्रवेश ९० हजारांच्या दरम्यान पोहोचले आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एकंदरीत प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आली असून त्यासाठी अनेक उपक्रम, अभिनव धोरणे तसेच ‘एनईपी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातून संधीची उपलब्धता तसेच शिक्षक आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे हे ध्येय गाठू शकलो.
- डॉ. उज्ज्वला चक्रदेव, कुलगुरू, एसएनडीटी विद्यापीठ
--
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे पदवीचे व्यावसायिक, पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना शुल्क प्रतिपूर्तीची योजना राबवली जात आहे. त्यामुळे एसएनडीटीमध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. संख्या दुपटीहून अधिक वाढणे हे एक महत्त्वाचे आणि स्वागतार्ह पाऊल आहे.
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण


असे वाढले प्रवेश
शैक्षणिक वर्ष यूजी नोंदणी पीजी नोंदणी एकूण नोंदणी
२०२०-२१ ४४,९०८ ५,२३९ ५०,१४७
२०२१-२२ ४३,१५० ४,८८७ ४८,०३७
२०२२-२३ ४७,४७६ ४,८१७ ५२,२९३
२०२३-२४ ५६,१६४ ५,६७० ६१,८३४
२०२४-२५ ७७,९७३ ६,३५८ ८४,३३१

२०२५-२६मधील प्रवेश अद्यापही सुरू आहेत. ती संख्या ९० हजारांहून अधिक पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com