एशियाटिकसाठी संघटना एकवटणार
एशियाटिकसाठी संघटना एकवटणार
साहित्य संघाच्या धर्तीवर जनचळवळीसाठी हालचाली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : निवडणुकांच्या तोंडावर एशियाटिक सोसायटीमध्ये सभासद होण्यासाठी एकाएकी असंख्य अर्ज आले. यातील अनेक जणांची पार्श्वभूमी संशयास्पद असून, या सर्व घडामोडींचा लेखाजोखा ‘सकाळ’ने वाचकांपुढे मांडला. याची दखल अनेक संघटनांनी घेतली आहे. एशियाटिक कुणाच्याही हाती जाऊ नये, यासाठी मराठी साहित्य संघाच्या धर्तीवर एक व्यापक जनचळवळ उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दोनशे वर्षांहून अधिक काळापासून अमूल्य ग्रंथांचा ठेवा जपणारी एशियाटिक सोसायटी आर्थिक अडचणीत आली आहे. साडेतीन लाखांहून अधिक ग्रंथांचा ठेवा जपण्यासाठी पूर्णवेळ ग्रंथंपालदेखील नियुक्त करणे संस्थेला शक्य झालेले नाही. काही वर्षांपासून नवे सदस्य नोंदणीत संस्था कमी पडत आहे. दुसरीकडे या संस्थेचे व्यवस्थापन ताब्यात घेण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत.
काही विशिष्ट विचारधारेचे लोक गिरगावचा साहित्य संघ ही मराठी संस्था ताब्यात घेत असल्याचा मुद्दा निवडणुकीत खूप गाजला. मराठी विकास संस्थेच्या दीपक पवार यांच्यासह काही जणांनी यावरून रान पेटवले. याचा परिणाम म्हणून अनेक साहित्यिक, सभासद एकत्र आले. या एकीमुळे मतमोजणीत भालेराव पॅनेलला धूळ चारण्यात यश आले. या निकालानंतर एशियाटिकमध्येसुद्धा हा प्रकार हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.
बैठकीचे आयोजन
आता एशियाटिकच्या मुद्द्यावरही मुंबईतील मराठी संघटना एकटवणार असल्याचे चित्र आहे. राजकारणापलीकडे जाऊन एशियाटिकसंदर्भात एकत्र येण्याची तयारी काही राजकीय नेत्यांनी दाखवली आहे. यासंदर्भात लवकरच ऑनलाइन अन् ऑफलाइन बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून दीपक पवार यांच्या संस्थेने याकामी पुढाकार घेतला आहे. एशियाटिकमध्ये नेमके काय करायला पाहिजे, यावर या बैठकीत ऊहापोह होणार आहे.
काय असणार आहे रणनीती?
- समविचारी संस्थांना एकत्र आणणे
- एशियाटिकमधील गैरप्रकार समोर आणण्यासाठी व्यापक मोहीम
- नवे सदस्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न
- मुंबईकरांत जनजागृती करणे
- सक्रिय सदस्य नोंदणीद्वारे लोकशाही पद्धतीने तोंड देणे
..........
एशियाटिक वाचवण्यासाठी मुंबईतील सर्व मराठी संस्था, वाचक तसेच राजकारणापलीकडे जाऊन समविचारी व्यक्तींनी एकत्र यावे.
- दीपक पवार, अध्यक्ष, मराठी विकास संस्था
....
एशियाटिक कुणाच्या हाती जाऊ नये, यासाठी एक चळवळ उभी राहत आहे. त्याला संस्थात्मक रूप देणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रांतील दानशूर मंडळींनी आर्थिक मदत करून संस्थेला स्वावलंबी करण्यासाठी पुढे यायला हवे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींनी व्यवस्थापनात यायला पाहिजे.
- संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार
...
सांस्कृतिक वर्चस्व गाजवण्यासाठी या संस्था पद्धतशीर ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे. एशियाटिकमध्ये जे सुरू आहे, त्याविरोधात मुंबईतील सर्व मराठी वाचक, साहित्यिकांनी एकत्र येऊन एक चळवळ उभारायला पाहिजे. मी एक साहित्यिक व वाचक म्हणून या आंदोलनात पुढे असेन.
- ज. वि. पवार, साहित्यिक
....
एशियाटिकला वाचवणे हे मराठी अस्मितेची, महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- धनंजय शिंदे, सरचिटणीस, काँग्रेस
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.