ठाणेकरांना घडणार चारधामचे दर्शन
ठाणेकरांना घडणार चारधामचे दर्शन
टेंभीनाका येथे बृहदेश्वर मंदिराचा देखावा, उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : केवळ ठाणेकरांसाठीच नव्हे तर राज्यभरातील भक्तांचे आकर्षण असलेल्या टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवात यावर्षी चारधामचे दर्शन घडणार आहे. दुर्गेश्वरीच्या नवरात्रोत्सवासाठी या वेळी तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा साकारण्यात येणार आहे. अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा हा भव्य देखावा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
१९७८ साली ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे ४८वे वर्ष आहे. दरवर्षी आकर्षक रोषणाई आणि भव्य देखावा दुर्गेश्वरीसाठी उभारला जातो. यावर्षीच्या बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा साकारण्यात येणार आहे. या सजावटीची लांबी ११० फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला ४५ फूट आणि पुढच्या बाजूला ५५ फूट आहे. या देखाव्याची एकूण उंची साधारण ७५ फुटांपर्यंत पोहोचेल. या देखाव्यासाठी एकूण १२५ खांब वापरले असून, प्रत्यक्षात २६ खांबामध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत.
या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची २९ फूट असून, ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनले आहे. या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये बृहदेश्वर मंदिराचा कळस साकारण्यात आलेला नाही. त्याऐवजी कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण चारधाम मंदिरांची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. कलादिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरू आहे. यासर्व कामाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. १८) केली. या वेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते.
चौकट
प्रवेशद्वारावर भव्य शिवमूर्ती
प्रवेशद्वारावर २४ बाय २९ फुटांची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती २९ फुटी बृहदेश्वर मंदिराच्या शिवलिंगाचे समानत्व साध्य करते. तिच्या आसपास चारधाम देवालये उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा देखावा तयार करण्याचे काम मागील अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. सध्या जागेवर १२५-१५० लोक आणि बाहेर कास्टिंगसाठी मोल्डिंग, डिझायनिंग असे मिळून एकूण २००-२५० कलाकार दिवस-रात्र काम करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.