कष्टकऱ्यांच्या संघर्षाचे विश्वासार्ह नेतृत्त्व
कष्टकऱ्यांच्या संघर्षाचे विश्वासार्ह नेतृत्त्व
मधुताई धोडी
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. २१ : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागाच्या एका सामान्य आदिवासी घरातून निघून, असामान्य जिद्दीने समाजघटनेचे कठीण काम करणाऱ्या मधुताई धोडी या आदिवासी समाजाच्या सशक्त लोकनेत्या म्हणून उभ्या आहेत. तीन दशके त्यांची समाजाप्रती असलेली संघर्षमय वाटचाल आणि समर्पणाची कहाणी जेवढी प्रेरणादायी आहे, तेवढीच कठोरही आहे. वैयक्तिक आयुष्याची पर्वा न करता समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी दिलेले योगदान यामुळे त्यांना अन्यन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.
डहाणूतील आंबेसरी गावात १५ ऑगस्ट १९६७ मध्ये जन्मलेल्या मधुताई धोडी या आदिवासी वारली कुटुंबात वाढल्या. त्यांचे औपचारिक शिक्षण मर्यादित असले तरी समाजातील अन्याय व राजकारणातील विषमता यांची जाणीव त्यांना लहानपणापासूनच झाली. वडिलांच्या आदिवासी हक्क चळवळीतील सक्रिय सहभागामुळे मधुताईंना लहानपणापासून चळवळीचे बाळकडू मिळाले. समाजासाठी संघर्ष करून हक्क मिळवणे, हे सूत्र त्यांना चांगलेच ठाऊक आहे. असंघटितांना संघटित करून न्यायाच्या अंतिम निर्णयापर्यंत संघर्ष कसा करावा, याचे उत्तम शास्त्र मधुताई यांच्याकडे आहे.
लहान वयात समाज हक्काच्या लढ्याचे महत्त्व मधुताईंनी जाणले. त्याच प्रेरणेतून त्यांनी कष्टकरी संघटनेचा मार्ग स्वीकारला. आदिवासी समाजावर होणारा अन्याय, त्यांचे हक्क, समाजाच्या समस्या यांची जाण त्यांना होऊ लागली. त्यानंतर समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची ठाम जिद्द त्यांनी केली. त्यातच सामाजिक प्रश्नांना संघटनेतूनच उत्तर मिळते, हा त्यांचा ठाम विश्वास होता. हा विश्वास मनाशी पक्का करून त्यांनी कष्टकऱ्यांचा आवाज बनण्याचा निर्धार केला आणि कष्टकरी संघटनेसाठी स्वतःला झोकून दिले. कष्टकरी संघटनेच्या सभांमध्ये सतत्यापूर्ण सहभाग घेऊन त्याद्वारे वनहक्क, जमीनहक्क, मजुरीचे संघर्ष, आरोग्यसेवा, धन्य वितरण व्यवस्थेतील अर्थात रेशन व्यवस्थेतील अन्याय अशा विषयांच्या तळाशी जाऊन हक्काच्या चळवळीसाठी त्या संघटन कौशल्यवादी बनल्या. वंचिताच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्या धिरोदात्त हेतूने सदैव आघाडीवर होत्या.
गेल्या तीन दशकांपासून त्या डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या संघर्षाचे प्रतीक ठरल्या. संयम, चिकाटी, स्पष्ट विचार आणि संवादकौशल्य यामुळे त्या संघटनेतील एक विश्वासार्ह नेतृत्त्व म्हणून पुढे आल्या. त्यातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. हजारो एकर जमीन बुडवणाऱ्या प्रकल्पाविरोधात अग्रभागी राहून त्यांनी चळवळीचे नेतृत्व केले आहे. पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात जागृती करून जनसंघटन उभे करण्याचे काम मधुताई यांनी केले आहे. संविधानाधिष्ठित स्वतंत्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीत झालेल्या आदिवासी स्वशासन उपोषण आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. विशेषतः मधुताई या संघटनेसह महिला केंद्रित आहेत. महिलांवरील अन्यायाविरोधात व त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. म्हणून त्यांना आदिवासी महिलांचा आवाज म्हटले जाते.
सामाजिक कार्याची दखल
सध्या त्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनांतर्गत डहाणू उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य आहेत. मधुताई यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शालिनीताई गोठोस्कर पुरस्कार व डॉ. वसंतराव अवसरे स्त्री आदिवासी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. वैयक्तिक जीवनाची पर्वा न करता आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या मधुताई जोडी या आदिवासी समाजासाठी प्रेरणास्त्रोत असून, एक आदर्शवत नेतृत्व आहे.