भक्ती, उत्साह आणि रोषणाईचा संगम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ‘उदे गं अंबे उदे...’, ‘आई भवानीच्या नावाने उधो उधो...’ अशी साद घालत दरवर्षीप्रमाणे आज (ता. २२)पासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यासाठी ठाणे सज्ज झाले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात दुर्गादेवींच्या सुमारे ६०८ सार्वजनिक, तर तीन हजार २५४ घरगुती मूर्तींचे आगमन उद्या सोमवारी (ता. २२) होणार आहे. मानाच्या देवींसह आगमन होणाऱ्या दुर्गेश्वरीच्या स्वागत मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे, तर सात हजार ५३२ घटांची प्रतिस्थापनाही होणार आहे. पालिका निवडणुकीचे वेध असल्याने यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रचाराचा घट बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणेनगरीसह जिल्हा आकर्षक रोषणाईने न्हाऊन निघाला असून आदिशक्तीच्या जागराने दुमदुमणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे म्हणजे उत्सवांची पंढरी ठरली आहे. दहीहंडी, गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव. मुंबई, पुण्यापाठोपाठ ठाण्याचे आकर्षण असते. त्यातही शारदीय आणि चैत्र नवरात्रोत्सवात संपूर्ण राज्यातील भक्त आणि सेलिब्रिटी, राजकारणी दर्शनासाठी ठाण्यात हजेरी लावतात. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाका येथे सुरू केलेला जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव हे प्रमुख आकर्षण असते. भव्य मंडप, त्यात विराजमान होणारी दुर्गादेवीची मूर्ती, भक्तांची अलोट गर्दी, नऊ दिवस धगधगणारे हवनकुंड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जत्रा असे स्वरूप येथे असते. याशिवाय कल्याणच्या दुर्गाडी मंदिरात आयोजित दुर्गाडी नवरात्रोत्सवही तितक्याच उत्साहात होतो. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे हे दोन नवरात्रोत्सव मंडळ असले, तरी गेल्या काही वर्षांपासून ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर इत्यादी शहरांमध्येही आदिशक्तीचा उत्सव दणक्यात साजरा होत आहे.
देवीच्या मूर्तीसोबतच घटाची स्थापना करण्याची प्रथा आहे. त्यातही केवळ घट बसवणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या वेळी सुमारे सात हजार ५३२ घटांची स्थापना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवीची प्रतिमा ठेवून नऊ दिवस पूजन केले जाते. त्याभोवती फेर धरत गरबा खेळला जातो. अशा १३३ सार्वजनिक, तर २८७ ठिकाणी देवीच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे.
दांडिया-गरब्याची धूम
नवरात्रोत्सव म्हटले तर तरुणाईसाठी हे नऊ दिवस म्हणजे दांडिया-रास गरब्यात थिरकण्याची संधी असते. त्यांचा हा उत्साह ‘कॅश’ करण्यासाठी गरब्याचे आयोजन केले जाते. मुंबईत पूर्वी दिसणारी संस्कृती ठाण्यातही रुजली आहे. म्हणूनच यावर्षी रासगरब्याचे आयोजन करणाऱ्या तब्बल ५९० सार्वजनिक, तर ५०० खासगी आयोजकांची नोंद झाली आहे. यामध्ये माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित रासगरबा, आमदार प्रताप सरनाईक यांचे संस्कृती प्रतिष्ठान, मंत्री रवींद्र चव्हाण आयोजित ‘नमो रमो’ गरबा, तर एमसीएचआय क्रेडाई ठाणे यांचे रेमंड पटांगणात होणारा रासरंग हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवात ५५ मंदिरांमध्येही उत्सव साजरा होणार आहे. ठाण्यातील घंटाळी देवी, गावदेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, तसेच कल्याणच्या दुर्गाडी देवी, डोंबिवलीतील गावदेवी मंदिरांत खास व्यवस्था करण्यात आली आहे. पंचमी, अष्टमीला या मंदिरांमध्ये ओटी भरण्यासाठी भाविक गर्दी करण्याची शक्यता आहे. भजन, गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.
रामलीला, रावणदहन
नवरात्रीत आदिशक्तीच्या जागरसह रामाचीही उपासना केली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी रावणदहन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार उत्तर भारतीयांचा प्रभाव असलेल्या भिवंडी, उल्हासनगर, वागळे येथे तीन ठिकाणी रामलीलाचे आयोजन करण्यात आले आहे. वागळे सोडून सर्वच परिमंडळामध्ये १२ ठिकाणी रावण दहनचा थरार पाहायला मिळणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयातील मूर्ती ३,८६२
सार्वजनिक ६०८
घरगुती ३,२५४
परिमंडळनुसार मूर्तींची आकडेवारी
परिमंडळ सार्वजनिक घरगुती
ठाणे १०८ २३१
भिवंडी ९६ १८६
कल्याण १३६ २,६२४
उल्हासनगर ११८ ८९
वागळे १५० १२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.