थोडक्यात बातम्या नवी मुंबई
वाशीत भाजपचे महाआरोग्य शिबिर
तुर्भे (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियानांतर्गत वाशी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला तब्बल ६५८ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एमजीएम हॉस्पिटल व भाजपच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरात बॉडी मास इंडेक्स, ब्लड शुगर, रक्तदाब तपासणी, ईसीजी, दंत व नेत्र तपासणी, आयुर्वेदिक सल्ला तसेच मोफत औषधे, च्यवनप्राश व चष्मे वाटप करण्यात आले. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, पावसाळ्यात पसरत असलेल्या सर्दी, डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, म्हणून अशा शिबिरांची संकल्पना हाती घेतली आहे. प्रत्येक विभागात नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक राजू शिंदे, नीलेश म्हात्रे, वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे आदींसह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
..............
नेरूळ गावदेवी चौकातील फलक धोकादायक
जुईनगर (बातमीदार) ः नेरूळ गावदेवी चौक परिसरात लावण्यात आलेले प्रचंड मोठे फलक नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताची शक्यता वाढली असून, स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेने चौथरा बांधून दिशादर्शक फलक उभारला होता, मात्र त्यावर राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे फलक लावून परिसराचे विद्रूपीकरण केले जात आहे. सध्या विश्वकर्मा देवाच्या भजन संध्येसाठी लावलेला फलक चौथऱ्याच्या बाहेर आल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असलेल्या या चौकात अशा फलकांना पालिकेची परवानगी कशी मिळते, असा सवाल नागरिकांनी केला आहे. अपघाताचा धोका लक्षात घेता तातडीने हे फलक काढून टाकावेत, अशी मागणी होत आहे.
..................
भाजपतर्फे वृद्धाश्रमात अन्नदान
नेरूळ (बातमीदार) ः भाजपच्या वतीने नेरूळ सेक्टर-१० मधील मातृ सदन वृद्धाश्रमात वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान उपक्रम व ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व युवा नेते निशांत भगत यांच्या हस्ते केक कापून सर्व ज्येष्ठांना अन्नदान करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ महिला व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सानपाडा पाम बीच येथील उद्यानात कॅरम स्पर्धेचे उद्घाटन झाले. दरम्यान, ज्येष्ठांसाठी आयुष्मान भारत नोंदणी शिबिराचे आयोजन व वाहतूक कोंडी निवारणासाठी पोलिस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.
.....................
सानपाडा येथे क्रीडा साहित्याचे वाटप
नेरूळ (बातमीदार) ः वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १०० सामाजिक उपक्रमांच्या पंधरवड्यात सानपाडा येथे क्रीडा साहित्य व प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले. वाशी सेक्टर-२६ येथील डिझायनर सोसायटीत राज्य स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचा माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत व समाजसेवक संदीप भगत यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देत आरोग्य आणि क्रीडा संस्कार वाढविण्याचे आवाहन केले.
................
पावसामुळे बाधित नागरिकांना मदतीचा हात
पनवेल (बातमीदार) ः नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील अनेक कुटुंबांचे हाल झाले. घरात पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले. या संकटसमयी नगरसेविका सारिका भगत यांनी मदतीचा हात पुढे केला. महिलांच्या घरगुती गरजांचा विचार करून तांदूळ, डाळ, तेल, साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचे किट पूरग्रस्तांना वाटण्यात आले. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या या किटमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. या संकटात आपण एकटे नाही, हा दिलासा देणारा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
.............
एलईडी व्हॅनद्वारे मोदींचे जीवनचरित्र प्रदर्शित
नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून एलईडी व्हॅनद्वारे मोदींच्या जीवनावर आधारित चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. बेलापूर विधानसभा सहसमन्वयक शार्दुल कौशिक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या हस्ते झाला. या वेळी ज्ञानदीपसिंग चंडोक, कीर्तीकांत गोरडिया, अशोक टिळेकर, ऐजाज हुसैन, निलेश गाला, परशुराम पाटील, भारत मावळे, हिम्मत भरडवा, जसबिंदर भाटिया, रॉकी सिंग आदी मान्यवर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.