श्रेयवादाची लढाई
बविआ-भाजपमध्ये श्रेयाची लढाई
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा खुलासा; राजकीय रंग तापण्याची चिन्हे
विरार, ता. २१ (बातमीदार) ः विरार पूर्व-मनवेलपाडा विभागातील वीज समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा (महावितरण) खुलासा निवडणुकीच्या तोंडावर झाला असतानाही, या विषयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याने बहुजन विकास आघाडी (बविआ) व भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बविआच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज समस्यांच्या सोडवणुकीसाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती बविआला दिली होती. हीच माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण मांजरेकर यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी ती कामे स्वतःच्या प्रयत्नातून होत असल्याचे सांगितल्याने बविआकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. समाजमाध्यमांवर बविआ कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचे पुरावे प्रसिद्ध करताच वातावरण अधिक तापले आहे.
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व अवाजवी बिलांमुळे संतप्त रहिवाशांनी बविआच्या नेतृत्वात महावितरणविरोधात मोर्चा काढला होता. विरार जी. डी. गार्डन सभागृहात झालेल्या सभेत तब्बल २४ मागण्यांचे निवेदन महावितरणला देण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सरकारने वसई-विरारसाठी १,७०० कोटींचा निधी मंजूर केल्याचे व अखंडित वीजपुरवठ्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे महावितरणचे प्रभारी अभियंता ईश्वर भारती यांनी ठाकूर यांना लेखी खुलाशातून कळवले. तसेच १५ जुलै २०२५ रोजी मनवेलपाडा परिसरात वीज उपकेंद्रासाठी जागेची पाहणीही करण्यात आली.
बविआला दिलेला हा खुलासा कॉपी-पेस्ट करून भाजप नेते मांजरेकर यांनी फिरवला आणि स्वतःच्या नावावर कामांचे श्रेय घेऊ लागले. त्यामुळे बविआ कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. याआधीही मांजरेकर यांनी आमदार निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे श्रेय स्वतःकडे घेतल्याने वाद निर्माण झाला होता.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विजेबाबत सुरू झालेली ही श्रेयवादाची लढाई आता महापालिका निवडणुकीपर्यंत रंगत जाण्याची चिन्हे आहेत. बविआ व भाजप आमनेसामने येत असल्याने विरारमधील राजकारण अधिक तापणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.