समुद्रात धाडस, जमिनीवर संघर्ष

समुद्रात धाडस, जमिनीवर संघर्ष

Published on

समुद्रात धाडस, जमिनीवर संघर्ष
३०० जणांचे जीव वाचवणाऱ्या गेटवेच्या देवदूताची कहाणी

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : गेटवे ऑफ इंडियावर पर्यटक आणि मुंबईकरांची वर्दळ नेहमीच सुरू असते. गर्दी, गोंगाट, बोटांची ये-जा आणि खवळणारा समुद्र मात्र याच समुद्रात बुडून अनेकांनी आपले जीव गमावले, पण या लाटांशी झुंज देत शेकडो जीव वाचवणारा एक देवदूत मात्र इथे शांतपणे उभा असतो. मोहम्मद नाझीम समिम शेख असे त्याचे नाव आहे. तो साधा पाववाला, पण त्याच्या धाडसामुळे ३०० हून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत. तरीही या गेटवेच्या देवदूताला अद्याप स्थिर नोकरी मिळालेली नाही, त्याचा जमिनीवरचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.

कुलाब्यातील आझाद नगरच्या झोपडपट्टीत नाझीम पत्नी आणि चार मुलांसह राहतो. पहाटे बेकरीतून पाव आणून तो सायकलवर गल्लोगल्ली विकतो. त्यातून मिळालेल्या पैशांतून तो आपल्या कुटुंबांचा कसाबसा उदरनिर्वाह चालवतो, मात्र या संघर्षमय जीवनातही त्याने कधीही समुद्राकडे पाठ फिरवली नाही. ‘माझ्या मुलांचे खर्च वाढत आहेत. रोजीरोटीवर योग्य पद्धतीने कुटुंबीयांचा सांभाळ होत नाही. त्यामुळे आता नोकरी हवी आहे,’ असे त्याने सांगितले. नाझीमचे समुद्राशी नाते लहानपणापासून आहे. ‘मी १४ वर्षांचा असतानाच पट्टीचा पोहणारा बनलो. गेटवेवर रोज मित्रांसोबत पोहायला यायचो. त्यामुळे पाण्याची भीती कधी वाटलीच नाही. पुढे पोहणे हा छंद बनला आणि याच छंदामुळे मी येथे सुरक्षा रक्षक (लाइफ गार्ड) झालो. १९९० पासून गेटवेवर लक्ष ठेवून आहे. समुद्रात पडलेले पर्यटक असोत वा बेपर्वाई करणारे तरुण, प्रत्येक वेळी जीवाची बाजी लावून पाण्यात उतरलो आणि लोकांना वाचवले. देवानेच मला या कामासाठी बनवले आहे,’ असे तो म्हणतो.

‘मी कोणाचा धर्म, जात, वय पाहिले नाही. फक्त त्यांचा जीव वाचवायचा एवढेच डोक्यात असते,’ असे तो सांगतो, पण या कामाचे वेगळे दुःखही त्याने व्यक्त केले. ‘साहेब, एवढ्या लोकांना वाचवले, पण एकही पुन्हा भेटायला आला नाही. पैशाची अपेक्षा नाही, पण ज्या माणसाचा जीव वाचवला त्याने एकदा तरी भेटावे, एवढेच मला वाटते. अशी भावनाही त्याने ‘सकाळ’कडे व्यक्त केली.


नोकरीसाठी धडपड
मोहम्मद नाझीम समिम शेख हा नोकरी मिळावी म्हणून २०१९  पासून प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, त्यावरून त्यांच्या कार्यालयाने सकारात्मक प्रतिसादही दिला. राज्य सरकारला शिफारस झाली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार भाई जगताप यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले; मात्र शासनाकडून कोणतीही ठोस हालचाल झाली नाही. मला या कामाचे पैसे नकोत. ही माझी ईश्वरसेवा आहे, पण कुटुंबासाठी नोकरी हवी, अशी त्याची आर्त मागणी त्याने ‘सकाळ’सोबत बोलताना केली.


गेली २५ वर्षे मी गेटवेवर ३०० हून अधिक लोकांचे जीव वाचवले. ही माझी ईश्वरसेवा आहे, पैशासाठी नाही, पण माझे कुटुंब पावाच्या विक्रीवर चालते. मुलं मोठी होत आहेत, खर्च वाढतो आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून प्रतिसाद आला, मात्र महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे अजून नोकरी मिळालेली नाही. मला फक्त कुटुंबासाठी स्थिर नोकरी हवी आहे.
- मोहम्मद नाझीम समिम शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com