दि.बा नामकर समितीची सभा वादळी

दि.बा नामकर समितीची सभा वादळी

Published on

दि. बा. नामकरण समितीची बैठक वादळी
नाव न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून स्थापन झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीमध्ये वाशी येथे वादळी बैठक झाली. विमानतळाचे उद्घाटन लवकरच होण्याची चर्चा असतानाही केंद्र सरकारकडून नामकरणाचे परिपत्रक प्रसिद्ध होत नसल्याने समितीच्या नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले. खासदार सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर लवकरात लवकर दि. बांचे नाव घोषित न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. तत्पूर्वी येत्या बुधवारी समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
वाशी येथे आयोजित केलेल्या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, खासदार संजय पाटील, सुरेश म्हात्रे, दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, संतोष केणे, रिपाई नेते जगदीश गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्र सरकारच्या दिरंगाईवर टीका करत आंदोलनाचा इशारा दिला. यावर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सरकारी कामाला वेळ लागत असल्याचे सांगत, केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला; मात्र समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी मध्यस्थी करून तो मिटवला.
राज्यमंत्री मंडळाची बैठक येत्या मंगळवारी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची समितीमार्फत भेट घेणार असल्याचे दशरथ पाटील यांनी बैठकीत सांगितले. यावर सर्वांचे एकमत झाले, परंतु फडणवीस यांच्या भेटीनंतर केंद्र सरकारने दि. बांच्या नावाबाबत परिपत्रक न काढल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दशरथ पाटील यांनी दिला. याप्रसंगी रामशेठ ठाकूर, महेंद्र घरत आणि जगदीश गायकवाड यांची भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com