"परंपरा" बासरी वादनाने कल्याणकर मंत्रमुग्ध
‘परंपरा’ बासरी वादनाने कल्याणकर मंत्रमुग्ध
गुरुकुल प्रतिष्ठानचा अविस्मरणीय सांगीतिक सोहळा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ ः गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘परंपरा’ बासरी वादन महोत्सवाने रविवारी (ता. २२) कल्याणकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. के. सी. गांधी शाळेच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या अविस्मरणीय सोहळ्यास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदाच्या सातव्या वार्षिक सांगीतिक सोहळ्यासाठी आयुक्त अभिनव गोयल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत आणि विविध लोकप्रिय सिनेगीतांवर सादर केलेल्या सुमधुर बासरी वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पराक्रम गाजवणाऱ्या जवानांना दिलेली स्वरांजली. विद्यार्थ्यांनी आपल्या बासरी वादनातून वीर जवानांना मानवंदना अर्पण करताना संपूर्ण सभागृह अक्षरशः भारावून गेलेले पाहायला मिळाले, तर दुसऱ्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांचे शिष्य प्रशांत बनिया यांनी सादर केलेल्या शास्त्रीय संगीताच्या बासरी वादनाने रसिकांना अद्भुत अनुभूती दिली, तर चार्वाक जगताप यांनी तितक्याच ताकदीची तबला संगत केली. त्यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार आणि नामवंत तबलावादक पंडित सत्यजित तळवलकर यांच्यातील जुगलबंदीलाही उपस्थितांनी मोठी दाद दिली. या दोन्ही कलाकारांनी बासरी आणि तबल्याच्या अप्रतिम लयकारी, तालबद्ध सादरीकरणाद्वारे या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यासोबतच सुप्रसिद्ध निवेदिका प्राजक्ता आपटे यांनी आपल्या रसाळ भाषेतून केलेल्या सूत्रसंचालनालाही उपस्थितांची पसंती मिळाली.
संपूर्ण कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासोबत पसंतीची पोचपावती दिली, तर आपल्या भारतीय संस्कृतीमधील शास्त्रीय संगीताचा संपन्न वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम अशा कार्यक्रमांतून गुरुकुल प्रतिष्ठान सातत्याने करत असल्याची भावना या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.