वीज समस्यांवर श्रेयाची लढाई
विरार, ता. २२ (बातमीदार) : ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरार पूर्वेतील मनवेलपाडा विभागातील वीज समस्यांसंदर्भातील महावितरणने खुलासा केला आहे. आता या विषयाचे श्रेय घेण्याचा खटाटोप भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे.
मागील दोन वर्षांतील बहुजन विकास आघाडीच्या आंदोलनानंतर महावितरण विरार पूर्व विभागीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रगतिपथावरील विकासकामांची माहिती बविआ शिष्टमंडळाला दिली होती. हीच माहिती महावितरणने भाजपला दिली होती. त्या माहितीच्या आधारे आपल्यामुळेच ही कामे झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. त्यावर बविआच्या कार्यकर्त्यांनी महावितरणला दिलेले निवेदन समाजमाध्यमांवर फिरवण्यास सुरुवात केल्याने बविआविरोधात भाजप असा संघर्ष बघायला मिळत आहे.
वारंवार वीज खंडित आणि अवाजवी बिलांमुळे विरार पूर्व विभागातील संतप्त रहिवाशांनी बविआच्या नेतृत्वात महावितरणविरोधात १३ जुलैला मोर्चा काढला होता. या सभेत बविआच्या वतीने तब्बल २४ मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना दिले होते. याच समस्यांवर क्षितिज ठाकूर यांनी व्यासपीठावर उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. जसजशी महापालिका निवडणूक जवळ येऊ लागेल, तसे वातावरण आता चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.