माझा सोसायटी गणपती स्पर्धा उत्साहात
‘माझा सोसायटी गणपती स्पर्धा’ उत्साहात
मुंबई, ठाण्यातील अनेक गृहनिर्माण संस्थांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : आजच्या धावपळीच्या जीवनात ‘हाउसिंग सोसायटी’ हेच आपले विस्तारित कुटुंब ठरते. आनंद-दुःख वाटून घेण्याबरोबरच सण-उत्सवही येथे उत्साहात साजरे होतात. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘माझा सोसायटी गणपती स्पर्धा’ या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
मुंबई, ठाणे, बदलापूर, अंबरनाथपासून ते वसई–विरारपर्यंत असंख्य सोसायट्यांनी या स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. छायाचित्रे आणि प्रत्यक्ष भेटींमुळे परीक्षकांना सादरीकरणातील अनोखी विविधता जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. याशिवाय अजून १० सोसायट्यांमध्ये ‘माझा सोसायटी उत्सव’ आयोजित करण्यात आला. येथे स्टॉल्सवर स्पिन द व्हिल, संगीत खुर्ची यांसारखे खेळ, गाणी तसेच रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे आनंदाला आणखी रंग चढले. विजेत्यांना देण्यात आलेले ‘माझा’ प्रॉडक्ट्स आणि सामाजिक माध्यमांवर शेअर झालेल्या स्टोरींनी वातावरण अधिक उत्साहपूर्ण बनवले.
हाउसिंग सोसायट्या या उत्सवांच्या माध्यमातून परंपरा, संस्कृती व इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतात. नाटिका, गीते, नृत्य आदी सादरीकरणांतून समाजाला सकारात्मक संदेश दिला जातो. त्यामुळे एकता, सहकार्य व सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत होते. हे उत्सव केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाज घडविण्याचे प्रभावी साधन ठरतात.
पूर्वीपासूनच सण-उत्सवांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना सहभाग घेण्याची संधी मिळते. कोणी सजावट करतात, कोणी नाटक, नृत्य, संगीत अशा सादरीकरणांची तयारी करतात. याच मंचामधून अनेक कलाकार, मराठी अभिनेते पुढे आले आणि त्यांनी आपल्या क्षेत्रात यश संपादन केले. अशा उपक्रमांमुळे कला, अभिनय, नृत्य, संगीत यांसारख्या क्षेत्रांत रस निर्माण होतो आणि नवे कलाकार घडण्यास मदत होते. त्यामुळे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व आजही तितकेच मोठे आहे. नावीन्यपूर्ण आरास (थीम सजावट, प्रकाश-ध्वनी, आकर्षक मूर्ती) आणि सामूहिक सादरीकरण (आरती, भजन, पारंपरिक कला) या श्रेणीत ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या सोसायटीत प्रत्यक्ष जाऊन ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि भेटवूस्त देण्यात आल्या.
‘सकाळ’ आणि ‘माझा’ या ब्रँडने सोसायटी गणेश उत्सव या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी उत्तम सांस्कृतिक भान ठेवून समाजाला गणेशोत्सवाचे नव्याने महत्त्व पटवून देण्यासाठी सादर केलेल्या सामाजिक संकल्पना मोठ्या विचारक्षमतेच्या होत्या. चांगला संदेश या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यात पुरस्कार विजेते मंडळ यशस्वी ठरले. परीक्षक या नात्याने मला याचा आनंद झाला
- विजयराज बोधनकर
चित्रकार, लेखक, व्याख्याता
खरंतर यावर्षी पावसाने खूप त्रास दिला. मंडपात पाणी शिरले, तरीही सर्वांनी दिवस-रात्र आलटूनपालटून आपापली कामे वाटून घेत खूप मेहनत केली. त्याच मेहनतीमुळे आम्ही ‘चित्रपटाचा आजवरचा प्रवास’ हा देखावा लोकांसमोर उभा करू शकलो.
- प्रमोद सावंत,
अध्यक्ष, श्रीरंग सहनिवास
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजयराज बोधनकर, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे उपायुक्त उमेश घुगे यांनी काम पाहिले.
नावीन्यपूर्ण आरास
१. श्रीरंग सहनिवास, ठाणे
२. क्रिस्टल स्पायरस, ठाणे
३. झेनिथ टॉवर, मुलुंड
सामूहिक सादरीकरण
१. कृष्णा इस्टेट, बदलापूर
२. पंचरत्न, नालासोपारा
३. रुद्राक्ष कॉम्प्लेक्स, दहिसर