सामाजिक स्वास्थ्यासाठी ई-कचरा मुक्तीचा ध्यास
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २२ : डिजिटल उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, मात्र ई-कचऱ्याचे काय, असा गंभीर प्रश्न समोर येतो. वसईतील कीर्ती शेंडे यांनी हाच विचार करून ई-कचरा संकलनाचा ध्यास घेतला आहे. प्रदूषणमुक्तीचा ध्यास घेऊन हे काम अविरत सुरू ठेवणाऱ्या कीर्ती शेंडे यांचे पर्यावरणाप्रती असलेले प्रेम आणि समर्पकपणा यामुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यांनी पालघर जिल्ह्यात पर्यावरणपूरक चळवळीला सुरुवात केली आहे.
लोकांची चूक दाखवण्यापेक्षा आपल्या कृतीतून श्रीगणेशा केल्यास समाज जागरूक होतो, अशी धारणा ठेवत व प्रदूषण, पर्यावरणाला निर्माण होणारी हानी पाहता कीर्ती शेंडे यांनी ध्यास फाउंडेशनची स्थापना केली. प्लॅस्टिक, कचरामुक्तीला सुरुवात केली. याचदरम्यान ई-कचऱ्यामुळे होणारे विपरीत परिणाम पाहता त्याचे संकलन करण्यास पुढाकार घेतला. पालघर जिल्ह्यात प्रथमच ई-कचरा संकलनासाठी संस्था पुढे आली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अनेक जणांना ई-कचरा म्हणजे काय माहिती नाही आणि तो कुठे द्यावा, याबद्दल ज्ञान आणि सजगता नाही. हा कचरा योग्य ठिकाणी न दिल्यास प्रदूषण होऊ शकते व त्याचा परिणाम म्हणजे सर्वच सजीवांना धोका आहे. त्यामुळे वसई पश्चिमेला राहणाऱ्या कीर्ती शेंडे या जिल्ह्यातील नागरिकांना जागरूक करत आहेत. विविध ठिकाणी तयार होणारा ई-कचरा ध्यास फाउंडेशनकडे पुनर्वापर करण्यासाठी देण्यात यावा, तर यासाठी संकलन केंद्रे उभारली आहेत. त्यामुळे ई-कचऱ्यात समाविष्ट असलेली विद्युत वस्तूंचा ई-कचरा जमा केला जातो. यासाठी आठवड्याला ई-महाड्राइव्ह मोहीम हाती घेतली जाते.
ई-कचरा जाळला जातो, तेव्हा त्याच्यातून राख तयार होते. ती राख पावसाबरोबर किंवा कुठल्याही पाण्याच्या स्रोताबरोबर वाहत जाऊन नदी, समुद्रात मिसळली जाते. ई-कचरा असल्यामुळे त्याच्यात अनेक विषारी पदार्थ असतात. हे पाणी शेतीला वापरले गेल्यास जमिनीसह माणसावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ई-कचऱ्यामधील अनेक घातक धातूंमुळे गंभीर आजार होऊ शकतात. पुनर्वापरासाठी ज्यांच्याकडे एमपीसीपी प्रमाणपत्र आहे, त्यांनाच ध्यास फाउंडेशन ई-कचरा देते.
साडेचार टन कचऱ्याचा पुनर्वापर
कीर्ती शेंडे यांनी २०१७ मध्ये सुरू केलेल्या प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात २०० सदस्य काम करत आहेत. यात महिलांचा समावेश अधिक आहे. तालुक्यात २०० संकलन केंद्रे असून, आतापर्यंत एकूण साडेचार टन ई-कचरा जमा करून पुनर्वापर करण्यासाठी देण्यात आला आहे.
जगात ई-कचरा तयार होण्यात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. त्याच्या विल्हेवाटीची अनेकांना माहिती नसते. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण जाते, हाच विचार करून ई-कचरा संकलन मोहीम सुरू केली.
- कीर्ती शेंडे, अध्यक्षा, ध्यास फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.