मुरूडच्या कोटेश्वरी देवीचा उत्सव
मुरूडच्या कोटेश्वरी देवीचा उत्सव
मुरूड, ता. २२ (बातमीदार) ः मुरूड शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेले श्री कोटेश्वरी देवीचे मंदिर हे अखिल मुरूडकरांचे श्रद्धास्थान मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीत आजही कोटेश्वरी देवीचा आध्यात्मिक वारसा भक्तिभावाने जोपासला जातो. विशेष म्हणजे, कोटेश्वरी देवीला साक्षात तुळजाभवानीचे जागृत रूप मानले जाते.
१७६० ते १७७० या काळात या मंदिराची स्थापना झाली. जंजिरा संस्थानावर नवाबाचा अंमल असतानाही मंदिराच्या देखभालीसाठी धुपाडा दिला जात असे, असा उल्लेख आढळतो. पुढे १९७० रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशीला येथे मोठी यात्रा भरते, तर आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवाची सुरुवात धार्मिक विधींनी होते. उत्सव काळात देवीला मुखवटा, प्रभावळ, ढाल-तलवार, त्रिशूल, कमरपट्टा आणि पैंजण आदी अलंकार तसेच उंची वस्त्रांनी सजवले जाते. देवस्थान ट्रस्टच्या परंपरेनुसार गुरव कुटुंबीयांकडे दैनंदिन पूजेचा मान असतो. यंदा प्रथम पूजेचा मान गायत्री गणेश पाटील यांना मिळाला. नवरात्रोत्सवात कार्यकारिणी सदस्य उत्साहाने सहभागी होत धार्मिक कार्यक्रम पार पाडतात. शहरातील सर्व ज्ञातीबंधूंनी एकात्मतेने कार्यकारिणीवर निवड होणे ही विशेष बाब आहे. यंदा आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून १२ ऑगस्ट २०२५ रोजी भक्तनिवासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, भूमिपूजन समारंभ पार पडला आहे. सध्या भक्तनिवासाचे काम सुरू आहे, अशी माहिती ट्रस्ट अध्यक्ष नयन कर्णिक यांनी दिली.
................
ऐतिहासिक पार्श्वभूमी
जंजिऱ्याच्या सिद्दीला पराभूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी समुद्रात पद्मदुर्ग (कासा किल्ला) उभारला. मायनाक भंडारी व हिरोजी फर्जंद यांसारख्या झुंझार लढवय्ये शौर्याने लढले, मात्र जंजिऱ्याचा किल्ला सर करता आला नाही. किल्ल्यात अघटित घटना घडल्याने कोटेश्वरी देवीने ते स्थान सोडून मुरूडच्या किनाऱ्यावर येऊन वसाहत केली, अशी आख्यायिका प्रचलित आहे. आजही श्री कोटेश्वरी देवीचे मोहक रूप पाहण्यासाठी भाविक दूरदूरवरून मुरूडमध्ये येतात. धार्मिक वारसा, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भक्तिभाव यांचा संगम असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सव काळात भक्तीचा महापर्व रंगतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.