महिलांच्या सुरक्षा अन्‌ गाेपनीयतेवर दराेडा

महिलांच्या सुरक्षा अन्‌ गाेपनीयतेवर दराेडा

Published on

महिलांची सुरक्षा अन्‌ गाेपनीयतेवर दराेडा

लोकलच्या डब्यांत ‘भोंदूंचे जाळे’; वैयक्तिक माहितीतून लुटीचा डाव

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महिलांसाठी मुंबई हे सुरक्षित शहर मानले जाते; मात्र लोकल डब्यांतील भोंदूबाबांच्या जाहिरातींमुळे ही प्रतिमा धोक्यात आली आहे. लाेकलमधील गर्दी, ढकलाढकली, छेडछाडीच्या घटनांनंतर महिला प्रवाशांवर नवे संकट आले आहे. ‘कौटुंबिक कलह आहे का?’, ‘लग्न जमत नाही का?’, ‘प्रेमभंग झाला आहे का?’ अशा जाहिरातींमागे वैयक्तिक माहिती घेऊन त्यातून आर्थिक फसवणुकीची शक्यता वाढली आहे.

महिला भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे पटकन विश्वास ठेवून अशा फसव्‍या जाहिरातबाजीला सहज बळी पडू शकतात. समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘जालीम उपाय’च्या आशेने त्या माहिती आणि छायाचित्रे शेअर करतात. त्यामुळे त्यांची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊन त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जाण्याची शक्यता आहे.


रेल्वे प्रशासनाची जबाबदारी
अनेक प्रवासी, विशेषतः महिला फसव्‍या जाहिरातींच्या जाळ्यात अडकून आपली माहिती शेअर करतात. त्यातून वैयक्तिक गाेपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कुणालाही न सांगण्याची अट घालून पैशांची मागणी केली जाते आणि ‘२४ तासांत समस्या दूर’ करण्याच्या भूलथापा दिल्या जातात. प्रत्यक्षात समस्या सुटत नाहीच, उलट महिलांची सुरक्षितता आणि मानसिक स्थैर्य धोक्यात येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या जाहिरातींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
---
गाेपनीयता धोक्यात
लोकल प्रवासात आधीच महिलांना गर्दी, चेंगराचेंगरी, छेडछाड अशा समस्यांचा सामना करावा लागतो. आता या नव्या फसवणुकीमुळे मानसिक ताण वाढला आहे. समाजमाध्यमांपासून प्रत्यक्ष लोकल डब्यांपर्यंत भोंदूबाबांचा पसरलेला प्रभाव महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरू लागला आहे.

---
मुलाचा प्रेमभंग; भोंदूबाबाबरोबर संवाद

प्रतिनिधी : बाबा, माझा प्रेमभंग झाला. खूप त्रास होत आहे. उपाय सांगा.

भोंदूबाबा : बेटा, तुझी प्रेयसी कोण आहे? तिचे नाव, वडिलांचे नाव आणि छायाचित्र दे. छायाचित्राविना पूजा होऊ शकत नाही.

प्रतिनिधी : बाबा, नाव दिले नाही तर चालेल का?
भोंदूबाबा : नाही बेटा. अनेक मुलींचे नाव सारखे असू शकते. तिचे आणि तुझे छायाचित्र तसेच वडिलांचे नाव पाठवणे आवश्यक आहे.

प्रतिनिधी : बाबा, मग ती परत येईल का?
भोंदूबाबा : तिच्यावर काळ्या शक्तीचा प्रभाव आहे. सात शुक्रवार तिच्या नावाने मी जप करीन. तू रोज नदीत लाल फूल सोड. विश्वास ठेवलास तर चमत्कार होईल.

प्रतिनिधी : किती दिवस लागतील या विधीला?
भोंदूबाबा : शुक्रवारी तिच्या नावाने जप करीन. तुला सकाळी एक लाल फूल नदीत सोडावे लागेल. तुझे प्रेम परत येण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

प्रतिनिधी : पूजा कशी करायची, त्यासाठी काय लागेल?
भोंदूबाबा : ही साधी पूजा नाही, विशेष मंत्रसाधना लागते. त्यासाठी पूजा सामग्री, वेळ आणि माझे मंत्रपठण आवश्यक आहे.

प्रतिनिधी : खर्च किती येईल?
भोंदूबाबा : विधीसाठी चार हजार १०० रुपये अर्पण करावे लागतील. यात नारळ, फुले, धूप, अंगारा आणि मंत्रपठण होईल.

प्रतिनिधी : बाबा, सध्या इतके पैसे नाहीत.
भोंदूबाबा : अर्धे आता अन्‌ उरलेले विधी पूर्ण झाल्यावर दे. उशीर केलास तर प्रेयसी दुसऱ्याच्या आयुष्यात रमून जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com