ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाची द्वारं उघडणारी नवदुर्गा
ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाची द्वारं उघडणारी नवदुर्गा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पोटापाण्यासाठी आपले तांडे-वस्ती सोडून गुजरातमधल्या बारडोली परिसरात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंचाडे तांड्यावरील शिक्षिका अरुणा पवार यांनी केले आहे. नवदुर्गेच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी या शिक्षणातील नवदुर्गा ठरलेल्या पवार यांचा शालेय शिक्षण विभागाने सोमवारी (ता. २२) मुंबईत ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला.
बीए, बीएडचे शिक्षण घेतलेल्या अरुणा पवार या धुळ्याजवळच असलेल्या बीरडाने गावातील रहिवासी आहेत. गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक चांगल्या करण्यासाठी त्यांनी प्रण केला आणि त्यातून त्या या क्षेत्राकडे वळल्या. शिक्षिका झाल्यानंतर त्यांनी आपली दोन्ही मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवून त्यांना उच्चशिक्षित केले. गोरगरीब आणि तांड्यांवरील स्थलांतर होऊन आपल्या आईवडिलांसोबत गुजरातच्या बारडोली आदी परिसरात गेलेल्या ६० हून अधिक मुलांना परत तांड्यावर आणून त्यांना आपल्या आईसारखी वागणूक देत त्यांना शिक्षण दिले. पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी ही मुले आपल्या आईवडिलांपासून आजी-आजोबा, मावशी आदींजवळ ठेवण्यासाठी त्यांनी प्रत्येकाशी समन्वय साधला. रोज रात्री या मुलांना आपल्या आई-वडिलांसोबत कधी फोनवर तर कधी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद ठेवत मुलांना अंचाडे तांड्यावर रमवून ठेवले. त्यांच्या आरोग्यापासून ते त्यांना लागणाऱ्या शालेय साहित्याची सगळी काळजी अरुणा पवार यांनी घेतली.
तांड्यावरील शाळेचा कायापालट
मुले शाळेत रमण्यासाठी ही शाळा डिजिटल करण्यापासून पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकारचे प्रयत्न अरुणा पवार यांनी केले. या शाळेचा कायापालट केला. तांड्यावरच्या शाळेत संगणक, प्रिंटरपर्यंत सोयी उपलब्ध केल्या. यामुळे अंचाडे बंजारा पाड्यातील शाळा चर्चेत आली आणि यामुळे जवळ असलेल्या चिंचखेडे, अंचाडे गावातील पालकांनीही आपली मुले अंचाडे तांड्यावरील शाळेत दाखल केली. अरुणा पवार यांच्या या कामाची दखल सरकारदरबारी घेण्यात आली.
--
अंचाडे तांड्यावरील सर्व मुले मराठीसोबत आपल्या गोरमाटी म्हणजेच बंजारा समाजाच्या मातृभाषेत सवांद साधायची. त्यांच्याकडून मी गोरमाटी ही भाषा शिकली. यामुळे या मुलांना केवळ शिक्षिकाच नव्हे तर आपली आई असल्यासारखे वाटायचे. यामुळे त्यांना आपला विश्वास वाटू लागला. यातून ते शिक्षण घेण्यासाठी प्रेरित होत. यातून मुले आपल्या आईवडिलांसोबत स्थलांतर होण्यापासून रोखली गेली. परिणामी शाळेची पटसंख्या वाढली
- अरुणा पवार, सहाय्यक शिक्षिका, अंचाडे, जि. धुळे
--
शहरी आणि ग्रामीण भागात, विशेषत: तांड्यावर राहून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य शिक्षिका पवार यांनी केले. त्या खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या क्षेत्रात नवदुर्गा ठरल्या आहेत. बालविवाह रोखणे, नवसाक्षर वर्ग चालवणे आणि वर्षभर शाळा चालवणारी शाळा म्हणून त्यांनी एक वेगळा पायंडा निर्माण केला. यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला.
- डॉ. महेश पालकर, संचालक, शिक्षण संचालनालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.