कल्याण अवती भवती

कल्याण अवती भवती

Published on

कल्याणमधील किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सवाला सुरुवात
कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर दरवर्षी भव्य नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे आणि नवरात्रीच्या काळात लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. घटस्थापनेपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमीपर्यंत मोठ्या उत्साहाने व आनंदाने येथे नवरात्र महोत्सव भरतो. या काळात येथे जत्रादेखील भरते, ज्यामध्ये विविध खेळणी व पाळणे यांचा समावेश असतो. स्थानिक आणि आसपासचे नागरिक तसेच पर्यटक या उत्सवात सहभागी होऊन देवीच्या पूजनाचा आनंद घेतात. किल्ला दुर्गाडीची ही जत्रा आणि उत्सव स्थानिक संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे, ज्यामुळे परिसरात एक उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होते. या उत्सवामुळे धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा सन्मान होतो आणि कल्याण भागात लोकांच्या एकत्र येण्याची परंपरा कायम राहते.
...............................
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सायकल रॅली
कल्याण (वार्ताहर) : कल्याण महापालिकेच्या शिक्षण विभागाने शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा भाग म्हणून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले आहेत. या मोहिमेच्या भाग म्हणून रविवारी स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्यासाठी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये महापालिकेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे १७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीची सुरुवात महापालिका मुख्यालयातून झाली आणि गांधी चौक, पार नाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौक असा मार्ग पार करून पुन्हा मुख्यालयात संपली. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा दिल्या आणि स्वच्छता शपथ घेतली. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छता राखण्याबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याचे महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी सांगितले.
...................
दुर्गाप्रसाद हटवार यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार
कल्याण (वार्ताहर) : नरिमन पॉइंट, मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार समारंभात दुर्गाप्रसाद हटवार यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व इतर प्रमुखांच्या हस्ते दिला गेला. कल्याण येथील रहिवासी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमातील धारावी शाळा क्रमांक १७ चे शिक्षक हटवार गेल्या १७ वर्षांपासून गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. ते सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना २०२१ मध्ये महापौरांकडून आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला होता. हटवार यांनी आर्थिक अडचणींवर मात करून शिक्षण घेतले व त्यानंतर आपल्या समाजसेवेसाठी काम केले. त्यांच्या या योगदानामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि सामाजिक संघटनांकडून त्यांचे कौतुक होत आहे. खांदेश मराठा मंडळ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com