माधुरी हीच त्यांची सरस्वती आणि दुर्गाही!
माधुरी हीच त्यांची सरस्वती, दुर्गाही!
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. २३ ः समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे. प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून ठाण्यातील माधुरी पाटील यांनी शिक्षणाच्या प्रसाराचा वसा घेतला. लग्न झाल्यावर केवळ चूल आणि मूल या संस्कृतीतच न रमता बीए बी.एड पदवीचे शिक्षण घेतले. आता त्या घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अशिक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. कौतुकाची बाब ही आहे, की त्यांचे विद्यार्थी कोणी लहान वयातील नसून थेट ६० ते ८० वयोगटातील महिला आहेत. ज्यांना त्यांच्या लहान वयात आई-वडिलांच्या घरी शिक्षण घेता आले नव्हते त्या आता माधुरी पाटील यांच्याकडे मुळाक्षरे गिरवू लागल्या आहेत. शिक्षित व्हायचे राहून गेलेले स्वप्न या वयात पूर्ण करीत आहेत.
माधुरी पाटील या सुखी सधन कुटुंबातील आहेत. लग्नानंतरही त्यांना असेच घर मिळाले. त्यामुळे आई-वडिलांकडे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माधुरी यांना सासरी आल्यावर आणखी शिक्षण घ्यावे, याची आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे गृहिणी म्हणून त्या आनंदात होत्या. इतर मुलींप्रमाणे त्यांचाही संसार चांगला चालला होता. आई झाल्यावर एका गृहिणीला आणखी काय हवे, म्हणून त्यांचे सासरकडील दिवस मजेत चालले होते; परंतु समाजसेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाल्याने लग्नानंतर आपणही हा वारसा सुरू ठेवावा, असे त्यांना वाटले. यातूनच त्यांनी गरीब, वंचित मुलांना शिक्षण द्यावे, असा विचार करून लग्नानंतर तब्बल १८ वर्षांनी बीए बी.एड पदवीचे शिक्षण घेऊन ठाण्यातील तीन हात नाका येथील पुलाखाली रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी सुरू केलेल्या सिग्नल शाळेत मोफत शिकवू लागल्या; मात्र कोरोनाच्या काळात त्यांचे शिक्षण देण्याचे काम बंद झाले. आता त्या गरीब वसाहतीत राहणाऱ्या दुर्लक्षित घटकाला शिकवू लागल्या आहेत.
५५ ते ८० वयोगटातील वृद्ध महिला त्यांच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांना शिकवता यावे, यासाठी त्यांनी स्वतःच्या पैशांतून शांतीनगर येथे एक गाळा भाड्याने घेऊन आजी-आईची शाळा सुरू केली आहे. यंदा त्यांच्या शाळेला तीन वर्षे झाली आहेत. सद्यःस्थितीत शाळेत २८ आजी-आई शिक्षण घेत आहेत तर एकूण ५० जणींनी शाळेत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आहे. प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ही शाळा भरते. शाळेत आजी-आईंना संस्थेच्या माध्यमातून सर्व शालेय साहित्य, गणवेश म्हणून एकाच रंगाच्या साड्या, स्कूल बॅग, नाष्टा दिला जातो. माधुरी यांना त्यांच्या प्रत्येक विद्यार्थिनीत त्यांची आई दिसते. त्यामुळे त्यांनी आईच्या नावाने जयश्री फाउंडेशन ही संस्था काढून त्यामार्फत शिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. या कामात त्यांना के. व्ही. सेवा ट्रस्टचाही हातभार लागतो.
त्यांच्या अंगी असलेली गाणी, ओव्या, कविता, नृत्य असे सारे कलागुण व्यक्त होण्याचे माध्यम त्यांना मिळाले आहे. त्यामुळे ही शाळा केवळ अक्षर ओळख देणारीच नसून आतापर्यंतच्या आयुष्यात जो आनंद घेता आला नाही, शालेयवयात खेळता-बागडता आले नाही, ते त्यांना आता येथे करता येत आहे. माधुरी यांच्यातील एका आगळ्यावेगळ्या शिक्षेकेने त्यांच्या आयुष्यात हा आनंद निर्माण करून त्यांना विद्यार्थी म्हणून जगण्याचे माध्यम दिले आहे. आजीला शाळेत सोडायला त्यांची मुले, काहींच्या सुना आणि काहींची नातवंडे येत आहेत. म्हणूनच ही शाळा आगळीवेगळी आहे. तर ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या माधुरी पाटील त्यांच्यासाठी सरस्वती आणि दुर्गाचेही रूप आहेत, असे या आजी-आई विद्यार्थिनी मानतात.
वाचन-लेखनासह जगण्याचा आनंद
पूर्वी सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या स्वप्नांना विसरून अनेक महिला संघर्ष करीत होत्या. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आणि गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही; पण आजी-आई शाळेच्या माध्यमातून त्या आता शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करून घेऊ लागल्या आहेत. भले या शिक्षणाचा त्यांना या वयात नोकरीसाठी उपयोग होणार नाही; परंतु याही वयात आपल्याला शाळेत जायला मिळत आहे, यातच त्यांना मोठे समाधान वाटत आहे. माधुरी यांच्या या विद्यार्थिनी अक्षर ओळख, बाराखडी, अंक ओळख, वाचन, लेखनासोबतच जगण्याचा आनंद घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.