भंगार वाहनांवर कारवाई
भंगार वाहनांवर कारवाई
ठाकुर्ली परिसरातून मोहिमेला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली (ता. २३) : ठाकुर्ली परिसरातील चोळेगाव, खंबाळपाडा, भोईरवाडी आणि ९० फिट रोडवरील भंगार वाहनांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फ प्रभाग विभागाने कठोर कारवाई केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक चारचाकी, दुचाकी आणि तीनचाकी वाहने रस्त्यांवर धूळखात भंगार अवस्थेत उभी होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच या वाहनांमुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी तर झालीच, शिवाय रस्त्यांची स्वच्छतादेखील शक्य होत नव्हती.
फ प्रभागातील सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली या वाहने उचलण्याचा उपक्रम राबवण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन वाहने कोणाच्या मालकीची आहेत का, याचा शोध घेतला; मात्र कोणीही त्यावर हक्क सांगितला नाही. परिणामी, हायड्रा मशीनचा वापर करून खंबाळपाडा, ठाकुर्ली, चोळेगाव आणि ९० फिट रोड परिसरातून बेवारस भंगार वाहने संपूर्ण काढून टाकली आहेत. ही वाहने एका ट्रकमध्ये भरून पालिकेच्या भंगार वाहन केंद्रावर नेण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच अनेक वर्षे या वाहनांखाली कचरा साचलेला होता. त्यामुळे त्वरित घनकचरा विभागाकडून साफसफाई करण्यात आली. वाहन उचललेल्या जागा नीटनेटकी करण्यात आली, ज्यामुळे परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित झाला आहे.
लोकांनी या मोहिमेचे कौतुक करत पुढील पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, टिळकनगर, टिळकरोड, चार रस्ता आणि मानपाडा रोडसारख्या भागांमध्येही अशा कारवाईची मागणी केली आहे. सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले की, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या बेवारस भंगार वाहनांवर सातत्याने कारवाई केली जाणार आहे. आगामी काळात या भागातील इतर ठिकाणांचीदेखील नियमित तपासणी केली जाईल.
वाहतुकीला अडथळा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फ प्रभाग हद्दीतील ९० फिट रोड, चोळेगाव, खंबाळपाडा, भोईरवाडी या भागात मागील दोन ते तीन वर्षांपासून चारचाकी, दुचाकी, तीन चाके वाहने रस्ते, पदपथ अडवून उभी करण्यात आली होती. त्यावर धूळ साचून पावसात भिजून तर अनेक वाहने गंजलीदेखील आहेत. या भंगार वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येत होता.
फ प्रभाग हद्दीत मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि बेवारस भंगार स्थितीत असलेली वाहने पाहणीची मोहीम सुरू केली आहे. अशाप्रकारची वाहने कोणाच्या मालकीची आहेत का हे तपासून नंतर ही वाहने उचलण्याची कार्यवाही केली जाणार आहे. खंबाळपाडा भागातून अशी वाहने उचलण्यात आली आहेत.
- हेमा मुंबरकर, सहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.
....................
कारवाईची ठिकाणे
चोळेगाव
खंबाळपाडा
भोईरवाडी
९० फिट रोड
कारवाईची कारणे
वाहतुकीला अडथळा
स्वच्छतेत अडथळा
बेवारस भंगार वाहने
वाहनांचा प्रकार
चारचाकी
दुचाकी
तीनचाकी
कारवाईचा परिणाम
वाहतूक सुगम
परिसर स्वच्छ
नागरिक समाधानी
पुढील कारवाईसाठी मागणी
पेंडसेनगर
सारस्वत कॉलनी
टिळकनगर
टिळकरोड
चार रस्ता
मानपाडा रोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.