११ हजार वृक्षांची पुनर्लागवड

११ हजार वृक्षांची पुनर्लागवड

Published on

११ हजार वृक्षांची पुनर्लागवड
तानसा धरण परिसर हिरवागार

शहापूर, ता. २३ (वार्ताहर) : तालुक्यातील तानसा येथे मुंबई महापालिकेच्या असलेल्या धरणाच्या पायथ्याशी व परिसरात वृक्षांची पुनर्लागवड करण्याची मोहीम महापालिकेने युद्धपातळीवर हातात घेतली आहे. त्यामुळे धरणाच्या पायथ्याचा परिसर आणखी हिरवागार होणार आहे. तानसा धरणाचा परिसर हा अभयारण्याचा भाग असल्याने येथे झाडे व जैवविविधतेची कमतरता नाही. धरणाच्या परिसरात दाट जंगल आहे, परंतु मुंबईतील भांडुपमध्ये महापालिका दोन हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारत आहे. या प्रकल्पामुळे तेथील एक हजार २३५ वृक्ष बाधित झाली आहेत. या बाधित वृक्षांची भरपाई म्हणून महापालिकेने वृक्षांची पुनर्लागवडीची मोहीम हाती घेतली आहे.

खुद्द भांडुप येथील नव्याने उभ्या राहणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरात आतापर्यंत ४३८ वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली आहे, तर शहापूर तालुक्यातील तानसा येथील धरणाच्या पायथ्याशी भरपाई म्हणून ८३५ वृक्षांच्या तुलनेत अधिकतेने ११ हजार ४४३ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तानसा धरणाच्या पायथ्याशी आतापर्यंत १० हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. एक हजार ४४३ वृक्षांच्या लागवडीचे काम सुरू आहे. आधीपासूनच धरणाच्या परिसरात मुबलक वृक्षराजी आहे. त्यात महापालिकेने पुनर्लागवड केलेल्या वृक्षांची भर पडल्याने हा परिसर आणखी हिरवागार होणार आहे.

पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. भांडुप संकुलातील वृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवडीमुळे आपली हरित परंपरा मजबूत झाली आहे. झाडांच्या पुनर्लागवडीत रूट बॉल सारख्या शास्त्रीय पद्धतीचा वापर केल्यामुळे झाडे जगण्याचा दर शंभर टक्के मिळविणे शक्य झाले आहे. महापालिकेकडून पुनर्लागवड केलेल्या झाडांची नियमित निगा राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. झाडांना आवश्यक पाणीपुरवठा, छाटणी, खतांचा वापर आणि संरक्षणात्मक उपाययोजना वेळोवेळी करण्यात येत आहेत. महापालिकेने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची वचनबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

हरित परंपरेला नवी दिशा
पुनर्लागवड केलेल्या वृक्षांना नव्या कळ्या व कोवळ्या फांद्या फुटू लागल्या आहेत. उर्वरित बाधित ८३५ झाडांची भरपाई म्हणून तानसा धरण पायथ्याशी सूमारे १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आणखी एक हजार ४४३ झाडे लावण्यात येणार आहेत. हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनासाठीच नव्हे तर परिसरातील हरित सौदर्य वृद्धिंगत करण्यासाठीदेखील महत्त्वपूर्ण ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com