थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

नेरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश घाडगे अपात्र
पनवेल (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील नेरे ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच प्रकाश गोपाळ घाडगे यांना वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नेरे येथील रहिवासी शंकर गोपाळ ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून सरपंचपद रद्द करण्याची मागणी केली होती. सुनावणीदरम्यान नेरे येथील गट क्र. २५८ या जमिनीची पडताळणी करण्यात आली. सदर जमीन महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याच्या नावे नोंद असतानाही प्रकाश घाडगे यांनी अतिक्रमण करून घर क्रमांक १५० अ बांधले असल्याचे निष्पन्न झाले. घराचे कायदेशीर वारसदार प्रकाश घाडगे असून, त्यांनी वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवून सरपंचपद रद्द करण्यात आले, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने ॲड. प्रल्हाद खोपकर व ॲड. सूरज रमेश म्हात्रे यांनी युक्तिवाद केला.
या निर्णयामुळे नेरे गावातील राजकारणात चर्चेला उधाण आले असून, पुढील ग्रामपंचायत सत्ता समीकरणात याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
..........
शिरवणे विद्यालयात विविध सामाजिक उपक्रम
नेरूळ (बातमीदार) : भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध उपक्रम राबवले. कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या भाग्यश्री चौधरी यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डॉ. पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझा वाढदिवस आज एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शालेय जीवनापासून माझी इच्छा होती की, गरीब व गरजू मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांच्यात मूल्यसंस्कार जोपासले जावेत. त्यांनी पुढे सांगितले की, शिरवणे विद्यालयातून शिकून अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंता व विविध पदांवर पोहोचले आहेत, हीच खरी शाळेची ओळख आहे. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत आपले विचार मांडले. या उपक्रमामुळे शिरवणे विद्यालयात आनंदी व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
....................
करावी गावात रंगले बकुळ बाग मासिक कवी संमेलन
नेरूळ, ता. २३ (बातमीदार) : नवरंग साहित्य संस्कृती कला मंडळ आणि भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करावे गावातील ज्ञानदीप हायस्कूल येथे बकुळ बाग मासिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सण उत्सव, हा यावर्षीचा विषय होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिका पाकीजा आत्तार यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय सणांमुळे आपल्याला वर्षभर आनंद व्यक्त करता येतो, तसेच सामाजिक एकोपा व परंपरेचे महत्त्व अधोरेखित होते. कवी संमेलनात नवी मुंबई, पनवेल, मुंबई, उल्हासनगर येथील नामवंत कवींनी सहभाग घेतला. ज्येष्ठ कवी खंडूजी अडागळे, मिलिंद कल्याणकर, गज आनन म्हात्रे, रूपाली शिंगे, अश्विनी म्हात्रे, सुचित्रा कुंचूमवर आदी कवींनी आपल्या कवितांमधून श्रोत्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष गज आनन म्हात्रे यांनी केले. या संमेलनामुळे साहित्यप्रेमींना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि काव्यविश्वाला नवी उभारी मिळाली.
..............
आयुष महासन्मान पुरस्कार सोहळा उत्‍साहात
नवी मुंबई : येथील रॅडिसन हॉटेलमध्ये नुकताच आयुष महासन्मान पुरस्कार सोहळा भव्यदिव्य वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केंद्र-राजकोट आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकारच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. आयुर्वेद, होमिओपॅथी, योग-नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, एक्युपंचर या क्षेत्रात कार्य करून समाजाच्या आरोग्यवर्धनात योगदान देणाऱ्या चिकित्सकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये एक्युपंक्चरिस्ट सचिन उसापकर यांना मणक्याच्या विकारांवरील संशोधन व ‘इंटिग्रेटेड’ उपचारपद्धती विकसित केल्याबद्दल गौरविण्यात आले. त्यांच्या उपचारामुळे अनेकांना मणका व सांध्यांच्या विकारातून आराम मिळाला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडे, आमदार श्वेता महाले, डॉ. मंगला कोहली, डॉ. प्रवीण जोशी तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. नितीन राजे पाटील, डॉ. बाबुराव कानडे, योगाचार्य भानुदास परबत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सचिन उसापकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या सोहळ्यामुळे आयुष क्षेत्रातील योगदानाला नवी दाद मिळाल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com