पावसामुळे सर्दी, तापाचा त्रास

पावसामुळे सर्दी, तापाचा त्रास

Published on

पावसामुळे सर्दी, तापाचा त्रास
मुंबईत रुग्णांमध्ये ३० ते ४० टक्के वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सर्दी आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक ३० ते ४० टक्के वाढ झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. खोकला, घसा खवखवणे, घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांसह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारशक्ती असलेले लोक यांना या हंगामी आजाराचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. आजारांपासून स्‍वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.
मुंबईत सतत वाढणाऱ्या आर्द्रतेमुळे फ्लू (इन्फ्लूएंझा) आणि सर्दीसारख्या हवेतील विषाणूंसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या दमट हंगामात राइनोव्हायरस आणि इन्फ्लूएंझा विषाणू हवेत आणि पृष्ठभागावर जास्त काळ टिकतात. त्‍यामुळे संसर्गाचा धोका वेगाने वाढतो. आर्द्रता आणि थंडीच्या या मिश्रणामुळे दमा, खोकला, श्वसनाचे आजार वेगाने पसरत आहेत.
मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांना सर्वाधिक धोका असतो. दमट वातावरण श्वसनमार्गाच्या संरक्षणास कमकुवत करते. त्‍यामुळे त्रास अधिक वाढू शकतो. या हवामानामुळे विषाणू आणि जीवाणूंचा प्रसार होण्यास मदत होते.

प्रतिबंध हाच सर्वोत्तम औषध
जे. जे. रुग्णालयातील प्रा. डॉ. मधुकर गायकवाड म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित हात धुणे, स्वच्छता राखणे आणि मास्क घालणे आवश्‍यक आहे. यामुळे हवेतील कण आणि विषाणूंचा थेट संपर्क कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार आणि वेळेवर लसीकरण, विशेषतः असुरक्षित गटांसाठी, संसर्ग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुले, वृद्धांनी काळजी घेण्याची गरज
बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कदम म्हणाले की मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे. या गटांसाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, मोकळ्या आणि हवेशीर जागांमध्ये राहणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे किंवा लसीकरण घेणे आवश्यक आहे.

स्वच्छतेकडे द्या लक्ष
जे. जे. रुग्णालयाचे छातीरोगतज्ज्ञ डॉ. रोहित हेडगे म्हणाले की, आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आरोग्‍याकडे लक्ष दिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला, गर्दी टाळा आणि नियमितपणे हात धुवा. घरातील स्वच्छता राखा, पुरेसे वायुवीजन आणि संक्रमित व्यक्तींपासून अंतर राखणे आवश्यक आहे. शिवाय, कोणतीही लक्षणे आढळल्‍यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी हे सामूहिक प्रयत्न महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com