मुंबई
वाशीत स्कूल व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात
वाशीत स्कूल व्हॅनच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : वाशी सेक्टर नऊ येथे मंगळवारी (ता. २३) सकाळी एका खासगी स्कूल व्हॅनचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन रस्त्याकडेच्या झाडावर आदळली, ज्यात दोन विद्यार्थी आणि चालक जखमी झाले.
वाशीतील फादर ॲग्नल स्कूलच्या १० विद्यार्थ्यांना घेऊन चालक जात असताना सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना एमजीएम रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या व्हॅनचालकाविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चालकाच्या म्हणण्यानुसार, व्हॅनचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी आरटीओमार्फत पुढील तपासणी केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले.