पायाभूत सुविधांचा अभाव

पायाभूत सुविधांचा अभाव

Published on

पायाभूत सुविधांचा अभाव
कल्याणमधील अ प्रभागात नागरिकांचा संताप

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अ प्रभाग हा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, शहराच्या तुलनेत या ग्रामीण भागाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची जोरदार भावना स्थानिकांमध्ये आहे. महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली, तर १९९५ पासून लोकप्रतिनिधींनी कारभार हाती घेतला. तेव्हापासून अनेक निवडणुका, अनेक लोकप्रतिनिधी झाले; परंतु अ प्रभागात पायाभूत सुविधांचा प्रश्न तसाच राहिला. १९९५ ते २०२० पर्यंत सहा वेळा निवडणुका झाल्या असून अनेक मान्यवर प्रतिनिधी या प्रभागातून निवडून आल्या आहेत. तसेच शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत होणारी कामे पाहता या प्रभागातील विकास खुंटला आहे.

टिटवाळा, अटाळी, मोहने, बल्याणी, वडवली, आंबिवली, उंभर्णी, गाळेगाव, शहाड, मांडा पश्चिम यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणी, आरोग्य, वाहतूक, रस्ते, मलनिस्सारण याबाबतीत आजही असुविधा आहेत. विशेष म्हणजे, मोहने व टिटवाळा परिसरात धरणे आणि जलउद्गम स्थाने असूनही या भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिकांना अजूनही टँकर, हंडा मोर्चा अशा मार्गांचा आधार घ्यावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. वडवली रेल्वे उड्डाणपूल तब्बल १२ वर्षांनी पूर्ण झाला, तर टिटवाळा उड्डाणपूल नुकताच तयार झाला आहे; मात्र अन्य महत्त्वाचे रस्ते अजूनही खड्ड्यांनी भरलेले आहेत. बल्याणी, आंबिवली, मोहने, उंभर्णी, गाळेगाव येथील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून अपघातांची शक्यता कायम आहे. मोहनेतील १९४२ मध्ये बांधलेला जुना पूल आजही वापरात आहे, त्याला पर्यायी पूल अजून मंजूर नाही.

आरोग्य सुविधांबाबतही अ प्रभागातील चित्र निराशाजनक आहे. मांडा आणि वडवली येथील आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मनोरंजनाच्या सोयी म्हणून काही जुनी व उपेक्षित उद्याने वगळता विशेष सुविधा नाहीत. अटाळी, महात्मा फुलेनगर यांसारख्या भागांतील उद्याने केवळ नावापुरतीच आहेत.

कल्याण-डोंबिवली शहरात क्रीडा संकुल, नाट्यगृह, बालभवन, सिटी पार्क आदी प्रकल्प साकारले गेले; मात्र अ प्रभागात अशा योजनांचा अभाव स्पष्ट दिसतो. अमृत योजनेचे कामही या भागात पोहोचलेले नाही, हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे लक्षण आहे. या पार्श्वभूमीवर, अ प्रभागातील नागरिकांचा प्रश्न असा आहे, की ‘विकासाचा समतोल साधायचा कधी?’ प्रशासनाने शहर आणि ग्रामीण भागातील विषमता दूर करून, अ प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

उद्यानांची आवश्यकता
शहाड परिसरात भूमिगत मलवाहिन्या आहेत. टिटवाळा पूर्व परिसरात टिटवाळा मंदिर रोड परिसर रस्ता आदी भागात भूमिगत मलवाहिन्यांचे जाळे दिसत असले तरी मोहने, आंबिवली, अटाळी, बल्याणी, गाळेगाव, मोहेली, उंभर्णी परिसरात भूमिगत मलवाहिन्यांच्या कामासाठी ‘अमृत’चा टप्पा प्रशासन साधू शकले नाही. सिटी पार्क, नौदल स्मारक, नाट्यगृह, क्रीडासंकुल, बालभवन, मैदाने आणि उद्याने ही कल्याण-डोंबिवली शहरात दिसतात. यंदा टिटवाळा पूर्वमध्ये एक अद्ययावत उद्यान झाले असले तरी प्रभागात इतर कुठेही उद्याने नाहीत. अटाळी येथील मिनी उद्यान आणि महात्मा फुलेनगर येथील जुने छोटेखानी उद्यान होणे आवश्यक आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com