हलक्या रेशीम लाकडाच्या दांडियांना पसंती
हलक्या रेशीम लाकडाच्या दांडियांना पसंती
नवरात्रोत्सवात स्थानिक कारागिरांचा सहभाग
शहापूर, ता. २५ (वार्ताहर) ः नवरात्रोत्सवात पारंपरिकतेसह सौंदर्य आणि स्थानिक हस्तकलेचा संगम पाहायला मिळत असल्याने, ग्राहक या रंगीबेरंगी आणि आकर्षक दांडियांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहापूर परिसरात दांडियांची जोरदार मागणी दिसून येत आहे. यावर्षी रेशीम लाकडापासून बनवलेली टणक पण वजनाने हलकी दांडिया विशेष आकर्षण ठरत आहेत. या प्रकाराच्या दांडियांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत असल्याचे दांडिया बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांनी सांगितले.
यंदा मात्र या छोट्या हंगामी व्यवसायावरही पावसाचे सावट जाणवत आहे. रेशीम लाकूड आणि इतर सजावटीच्या साहित्याचा तुटवडा, तसेच वाढलेला खर्च यामुळे यंदा दांडियांच्या किमतीत सुमारे १० टक्के वाढ झाली आहे. बाजारात साध्या रेशीम लाकडाच्या दांडियांची जोडी २० रुपयांपासून उपलब्ध आहे, तर आकर्षक डिझाइन आणि सजावटीच्या दांडिया १०० ते ३०० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत.
स्थानिक कुटुंबांची मेहनत
रेशीम लाकूड सुमारे १२ ते १८ इंच लांब कापून, त्याला योग्य आकार दिला जातो. त्यानंतर रंगीत कागद, रेशीम दोरे, चमकदार पट्ट्या, घुंगरू अशा विविध साहित्याने सजावट केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत महिला आणि कुटुंबांचा मोठा सहभाग असून, ही घरगुती उद्योगाची एक झलक आहे. तरुणाईमध्ये या दांडिया विशेष लोकप्रिय आहेत. या विविध डिझाइन व पर्यायांमुळे नवरात्रोत्सवात दांडियांचे आकर्षण अधिकच वाढले आहे. प्रत्येक दांडिया बनवताना कुटुंबातील सदस्य लाकूड कापणे, त्याला गुळगुळीत करून त्यावर सजावट करणे यासाठी परिश्रम घेतात. त्यामुळे हा केवळ एक व्यवसाय न राहता, कला, कौशल्य आणि संस्कृतीचा संगम बनला आहे.
विविध प्रकारांच्या दांडिया बाजारात
पट्टेदार रंगीत दांडिया
चमकदार कागदांनी सजवलेल्या दांडिया
रेशमी पट्टे आणि घुंगरू लावलेल्या दांडिया
मेटलच्या आकर्षक दांडिया