अडगळीतील कोनशीला झळकली दर्शनी

अडगळीतील कोनशीला झळकली दर्शनी

Published on

अडगळीतली कोनशिला दर्शनी झळकली
गडकरी रंगायतनचा वाद मिटला; टीकेची झोड उठताच पालिकेने चूक सुधारली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ ः नूतनीकरणानंतर गडकरी रंगायतनमधील कोनशिलेवरून रंगलेला वाद अखेर मिटला आहे. शिवसेना ठाकरे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने टीकेची झोड उठवल्यानंतर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कोनशिला अडगळीच्या ठिकाणाहून काढून ती आता दर्शनी भागात बसवण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने आपली चूक सुधारल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
ठाण्याचा मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचे कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. त्याचे उद्घाटन गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थाटात झाले. मात्र उद्घाटनावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते १५ डिसेंबर १९७८ रोजी उद्घाटन झालेली कोनशिला दर्शनी भागातून हटवून ती अडगळीच्या ठिकाणी लावण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे ठाण्यात राजकारण तापले होते. सर्वात आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी हा मुद्दा उपस्थित करून नाराजी व्यक्त केली. भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही यावर टीका केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी समाचार घेत कोनशिला दर्शनी भागात लावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता.
या सर्व घडामोडीनंतर ठाणेकरांनीही नाराजी व्यक्त करीत टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. त्यामुळे प्रशासनाने अखेर आपली चूक दुरुस्त करीत कोपऱ्यात बसवलेली ती कोनशिला पुन्हा दर्शनी भागात लावली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने समाधान व्यक्त केले आहे. सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या बॅनरवरील फोटोमुळे ठाण्यात वाद चिघळला आहे. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांची अडगळीत टाकलेली कोनशिला पुन्हा दर्शनी भागात बसवून पालिका प्रशासनाने दाखवलेल्या समजूतदारपणामुळे एक वाद तूर्तास तरी मिटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com