कळव्यात पाण्यासाठी आक्रोश
कळव्यात पाण्यासाठी आक्रोश
सत्ताधाऱ्यांचा प्रभाग समितीवर हंडा मोर्चा
कळवा, ता. २४ (बातमीदार) : कळवा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेकडून पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने बुधवारी (ता. २४) संतापाचा भडका उडाला. भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कळवावासीयांनी प्रभाग समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला. प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मडके फोडून या वेळी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे राज्यात सत्तेवर असलेल्या आणि पालिकेचे प्रशासन ताब्यात असलेल्या पक्षांनीच हा मोर्चा काढल्याने निदान आतातरी हंड्यात पाणी येईल, अशी अपेक्षा कळवावासी करत आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या कळवा उपनगराला गेल्या काही महिन्यांपासून टंचाईच्या झळा पोहोचत आहेत. ऐन पावसाळ्यातही येथील पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यात पारसिक नगर येथील ओझन वॅली येथून जलवाहिनीतून येणारे पाणी कमी दाबाने येत आहे. अनेक ठिकाणी गळती आणि पाणीचोरी होत आहे. त्यामुळे कळवावासीयांवर पाणीबाणीचे संकट ओढावले आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी वारंवार कळवा प्रभाग समिती येथील पाणीपुरवठा विभागात तक्रारी केल्या, परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही.
आगामी महापालिका निवडणुकीत कळवा आणि मुंब्रा हे सत्ता स्थापनेची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची झळ निवडणुकीत बसू नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न उचलून धरत बुधवारी जोरदार आंदोलन करत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ असल्याने या मोर्चाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी उपमहापौर अशोक भोईर, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, महिला सरचिटणीस नीता पाटील, पदाधिकारी हर्षला बुबेरा, विनोद पाटील, मनोज साळवी, लक्ष्मीकांत यादव आदी उपस्थित होते.
मागण्यांचा पाऊस
भाजप कार्यकर्त्यांनी व महिलांनी कावेरीसेतू ते प्रभाग समिती असा आक्रोश मोर्चा काढला. या वेळी महिलांनी डोक्यावर मडके घेत कळवा प्रभाग समितीच्या प्रवेशद्वाराजवळ फोडून निषेध व्यक्त केला. कळव्यात समान पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगून तो आठ व्हॉल्व तत्काळ खोलण्याची मागणी या वेळी केली. पाणीपुरवठा नियमित करावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ बांधून तयार असलेल्या जलकुंभाला नवी जलवाहिनी जोडून त्याच्यातून कळवा विभागाला पाणीपुरवठा करावा, एमआयडीसी व स्टेममधून खंडित होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भातील माहिती कळव्यातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात यावी. अशी मागणी कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली.
एमआयडीसीकडून अनियमित पुरवठा
मागील चार महिन्यांपासून एमआयडीसीकडून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सध्या तीन ते चार तास सकाळ संध्याकाळी पाणीपुरवठा नियमित सुरू राहील, तसेच गळती लागलेल्या जलवाहिन्या तातडीने दुरुस्त करून यापुढे पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन या वेळी पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.