दीड वर्षापासून वाशीच्या बस आगाराची इमारत उद्घाटनाविना

दीड वर्षापासून वाशीच्या बस आगाराची इमारत उद्घाटनाविना

Published on

वाशीच्या बस आगाराची इमारत उद्‍घाटनाविना
दीड वर्षापासून प्रवाशांना लोकार्पणाची प्रतीक्षा
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : वाशीत नवी मुंबई परिवहन सेवेचे प्रशस्त बस आगार उभारण्यात आले आहे. हे नवीन आगार आणि वाणिज्य संकुलाची इमारत उभारून दीड वर्ष होत आले आहे, परंतु या इमारतीचे लोकार्पण झालेले नाही. यामुळे प्रवाशांना आगाराबाहेरील थांब्यावर बसची वाट पाहावी लागते.
वाशीतील नवेकोरे बस आगार आणि वाणिज्य संकुल मध्यवर्ती भागात आहे. या जागेचे महत्त्व लक्षात घेत, हे आगार विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला होता. २००९ मध्ये या आगाराच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून सर्व बसेस बाहेरील थांब्यावरून सोडण्यात येत आहेत. आता सुसज्ज असे बस आगार आणि त्यावर २१ मजली वाणिज्य संकुल उभारण्यात आले आहे.
गेली कित्येक वर्षे तोट्यात असलेला परिवहन उपक्रम फायद्यात आणण्याच्या उद्देशाने वाणिज्य संकुलाकडे पाहिले जात आहे. या संकुलातील गाळे भाड्याने देऊन उत्पन्न मिळवणे, हा उद्देश आहे. त्यासाठी परिवहनच्या वतीने निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे, मात्र पुरेशा प्रतिसादाअभावी ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

१९० कोटींचा खर्च
तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी पुढाकार घेऊन या आगाराचे काम मार्गी लावले. आगारासह वाणिज्य संकुल उभारण्यास १५९ कोटी ८० लाख रुपये खर्चाला महासभेने मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात या प्रकल्पाचा खर्च १९० कोटींच्या घरात गेला.

लोकार्पणाच्या निर्णयामुळे बससेवा अडकली
वाणिज्य संकुलातील गाळे भाड्याने जात नसल्याने आगार सुरू केलेले नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. प्रवाशांची अडचण लक्षात घेत आगारातून बसचे परिचलन सुरू करावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत, मात्र संकुलाचे लोकार्पण झाल्याशिवाय आगार सुरू न करण्याच्या निर्णयावर परिवहन ठाम आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सुसज्ज बस आगार आणि वाणिज्य संकुल
इतर आगारामध्ये १४ अत्याधुनिक बस थांबे उभारले आहेत. येथून एनएमएमटीबरोबरच उपक्रमांतील बस ये-जा करू शकतील. त्यावर तीन मजल्यांवर स्वतंत्र वाहनतळ आहे. त्यामुळे इथे खासगी वाहनांना पार्किंग मिळेल. वाणिज्य व व्यावसायिक कार्यालये उभारली आहेत. यामुळे परिवहन उपक्रमाला दरवर्षी ३३ कोटी भाड्याच्या स्वरूपात मिळणे अपेक्षित आहे. या ठिकाणी जाहिरातीसाठीही योजना आखल्या गेल्या आहेत. या इमारतीच्या वाहनतळाच्या बाहेर डिजिटल फलकांद्वारे जाहिराती प्रदर्शित करण्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com